Breaking News

संरक्षण तरी द्या किंवा जिवंत समर्पणाची परवानगी द्या : मुख्यमंत्र्यांकडे अर्ज


बीड, दि.30 : धमक्या देणार्या आरोपीपासून संरक्षण द्यावे अन्यथा चितेवर जिवंत समर्पणाची परवानगी द्या असा अर्ज त्रस्त झालेल्या फिर्यादीने मुख्यमंत्र्यांकडे एका पत्राद्वारे केला आहे. बीड तालुक्यातील वासनवाडी येथे कुस्तीच्या फडात बाळू नामदेव पट्टेकर या तरुणाचा मारहाणीत मृत्यू झाला होता. धनराज दळवी याने दिलेल्या फिर्यादीवरून या प्रकरणात आरोपीविरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर फिर्यादीस आरोपींकडून मारहाणीच्या धमक्या येऊ लागल्या. पोलिसांनी संरक्षण द्यावे तसेच आरोपींना अटक करावे अन्यथा चितेवर जिवंत समर्पणाची परवानगी द्यावी, अशा मागणीचे पत्र मुख्यमंत्री यांना फिर्यादी धनराज दळवी यांनी पाठविले आहे. या बाबत अधिक माहिती अशी की, दि. 22 ऑगस्ट रोजी वासनवाडी येथे गवळीबाबा देवस्थान यात्रेत कुस्ती पाहण्यासाठी धनराज दळवी व बाळू पट्टेकर गेले होते. याचवेळी ‘तू आमच्यासमोर का उभा ठाकलास’? असे म्हणत मुन्ना घोलप, विजय जाधव, कृष्णा घोलप, संजय खोड, कृष्णा खोड यांच्यासह इतर लोकांनी बाळूला मारहाण केली, यामध्ये गंभीर जखमी होऊन बाळूचा मृत्यू झाला. बीड ग्रामीण ठाण्यात धनराज दळवी यांनी फिर्याद दिली. त्यानंतर दळवीसह त्यांच्या कुटुंबियांना आरोपींकडून फिर्याद मागे घेण्यासाठी दबाव येऊ लागला. तसेच धमक्या येऊ लागल्या. त्यामुळे दळवी यांनी पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली आहे.