औरंगाबाद, दि. 25, ऑगस्ट - महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ मर्यादीत शेळी मेंढी पालन संगोपन करण्यासाठी दाखल केलेला कर्ज प्रस्ताव मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून दहा हजाराची लाच घेणार्या एजंटाला अटक करण्यात आली. ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दुपारी जळगाव टी पॉइंट येथे केली.तक्रारदार याने एजंट सिद्धार्थ काशीनाथ नगराळे याच्या मार्फत महामंडळाकडे कर्ज प्रस्ताव सादर केला होता. नगराळे याने तक्रारदाराला माझ्या ओळखीच्या अधिकारी कर्मचारी यांना पैसे द्यावे लागतील, त्या शिवाय तुमचे पाच लाखांचे कर्ज मंजूर करणार नाही, असे सांगत 25 हजारांची मागणी केली होती. तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. या तक्रारीची सोमवारी पडताळणी केली तेव्हा नगराळे याने तडजोडीअंती दहा हजार मागितले. ही रक्कम घेऊन बुधवारी जळगाव टी पॉइंट जवळील हॉटेल लेमन ट्रीजवळ बोलावले होते. येथे लाच घेताना नगराळेला अटक करण्यात आली. त्याच्या विरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यातआला आहे.