Breaking News

घडतोय विश्‍वविक्रम, चिमुकले हात देत आहेत बाप्पाला आकार

पुणे, दि. 25, ऑगस्ट - शतकोत्तर रौप्यमहोत्सवी गणेशोत्सवानिमित्त महापालिकेतर्फे पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याचा उपक्रम आयोजित केला आहे. यात  तब्बल 3 हजार 82 विद्यार्थ्यांनी एकाच वेळी प्रत्येकी एक अशा 3 हजार 82 पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार केल्या. शहरातील विद्यार्थ्यांनी आपली कलात्मकता  दाखवत मातीच्या गोळ्यातून सुबक आणि देखण्या गणेश मूर्ती साकारल्या.
विद्यार्थ्यांना शिल्पकार विवेक खटावकर यांनी मार्गदर्शन केले आणि गणरायाची मूर्ती तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखविले. हा उपक्रम सकाळी 10.40 वाजता सुरु  करण्यात आला. या उपक्रमाची नोंद गिनीज बुकमध्ये करण्यासाठी महापालिका प्रयत्नात असून त्यासाठी सर्व व्यवस्था याठिकाणी करण्यात आली होती. यावेळी  विद्यार्थ्यांना शाडूच्या मातीबरोबर बिया देण्यात आल्या. या बिया मूर्ती तयार करताना त्यामध्ये वापरण्यात आल्या आहेत. या मूर्ती विद्यार्थ्यांना देण्यात येणार असून  गणेश मूर्तीचे विसर्जन घरासमोर करून ते झाड वाढविण्याच्या सूचनाही विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आहेत.
यावेळी बोलताना जावडेकर म्हणाले, शतकोत्तर रौप्यमहोत्सवी गणेशोत्सवानिमित्त महापालिकेतर्फे आयोजित केलेला उपक्रम देशासमोर आदर्श निर्माण करणारा आहे.  यातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला जाणार आहे. सूत्रसंचालन नगरसेवक धिरज घाटे यांनी केले तर उपमहापौर डॉ. धेंडे यांनी आभार मानले.
सनस मैदानावर आयोजित केलेल्या उपक्रमाचे उद्घाटन केंद्रीय मनुष्यबळ व विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट,  महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, आमदार मेधा कुलकर्णी, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, पालिका सभागृहनेते श्रीनाथ भिमाले,  महापालिका आयुक्त कुणाल कुमार, भाजपचे नगरसेवक, शहरातील विविध मंडळांचे पदाधिकारी, शहरातील विविध शाळांचे शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.