Breaking News

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. भीमराव गस्ती यांचे निधन

कोल्हापूर, दि. 08, ऑगस्ट - देवदासींचा आक्रोश मांडणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि साहित्यिक डॉ. भीमराव गस्ती यांचं आज (मंगळवार) पहाटे निधन  झालं. कोल्हापुरातील  एका खासगी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. ते 67 वर्षांचे होते. डॉ. गस्ती हे मूळचे बेळगावमधील यमनापूर येथील होते. तिथेच आज  सकाळी 11 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
देवदासी ही अनिष्ट प्रथा नष्ट व्हावी यासाठी भीमराव गस्ती यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. देवदासी महिलांच्या प्रश्‍नांसाठी तसंच बेरड-रामोशी समाजाच्या विकासासाठी  यमुनापूर इथे ‘उत्थान’ ही संस्था सुरु केली. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यात त्यांनी मोलाचं काम केलं. अंधश्रद्धा आणि रुढी-परंपरांनी जखडलेल्या बेडर  समाजात जन्मलेल्या डॉ. गस्ती यांनी गावच्या शाळेतच प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेतलं. पुढे एम. एस्सी. इलेक्ट्रॉनिक्स ही पदव्युत्तर पदवी मिळवल्यावर  रशियाची राजधानी मॉस्कोच्या पेट्रिक लुमुंबा विद्यापीठातून याच विषयात पीएचडी मिळवली. हैदराबाद येथील डीआरडीओमध्ये त्यांना ज्येष्ठ शास्त्रज्ञाची नोकरीही  मिळाली होती.
दरोड्याच्या गुन्ह्यात बेरड समाजातल्या वीस निरपराध्यांना कर्नाटक पोलिसांनी अटक करुन त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले. या अन्यायाने पेटून उठलेल्या  गस्तींनी न्यायासाठी झुंज दिली. मोर्चे काढले, आंदोलनं केली. या घटनेमुळे त्यांचं जीवनच बदललं आणि त्यांनी बेरड समाजाच्या उन्नतीसाठी स्वत:ला वाहून घेतलं.  निपाणीमध्ये त्यांनी 180 मुलींसाठी वसतिगृह सुरु केलं. देवदासीच्या प्रथा नष्ट व्हावी यासाठी सामाजिक प्रबोधनाची चळवळ सुरु केली. शेकडो देवदासींचे विवाह केले.  त्यांच्या अनेक वर्षांच्या प्रयत्नामुळे देवदासींच्या मुली आता शिक्षण घेऊन शिक्षिका, प्राध्यापिका, तहसीलदार झालेल्या आहेत.