Breaking News

टँक म्युझियममध्ये आयोजित शस्त्र व रणगाडा प्रदर्शनास मोठा प्रतिसाद

अहमदनगर, दि. 16, ऑगस्ट - स्वातंत्र्य दिनानिमित्त मंगळवारी (15 ऑगस्ट)लष्कराच्या अहमदनगरमधील आर्मर्ड कोअर सेंटर अँड स्कूल अर्थात एसीसी अँड एस  च्या वतीने शहराजवळ असलेल्या फराहबक्ष महाल(फर्याबाग) परिसरातील रणगाडा संग्रहालयात लष्करी शस्त्र व रणगाडे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.  आर्मर्ड कोअर सेंटर अँड स्कूल चे कमांडंट मेजर जनरल नीरजकुमारसहीत अनेक वरिष्ठ अधिका-यांनी प्रदर्शनस्थळी भेट देऊन आयोजनाबद्दल कौतुक केले.तसेच या  प्रदर्शनाला नागरिकांचाही उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. हजारो नागरिकांनी प्रदर्शनास भेट देऊन भारतीय लष्कराच्या सुसज्जते विषयी बारकाईने माहिती घेतली.
भारतीय लष्कराविषयी नागरिकांना विशेष माहिती देण्याच्या उद्देशाने नो युवर आर्मी(लष्कराला जाणून घ्या)या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक वर्षी रणगाडा संग्रहालयात अशा  प्रकारच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. नगरमधील हे रणगाडा संग्रहालय संपूर्ण आशिया खंडातील एकमेव रणगाडा संग्रहालय आहे.या संग्रहालयात 1914 मध्ये  तयार करण्यात आलेले रोल्स रॉयल्स,ग्रांट-कॅनाल डिफेन्स लाईट(सीडी एक),टाईप 95 हागो लाईट टँक,पेंडर स्पावेगन(8 रॉड),सेंच्युरियन मार्क 7 (मेन बॅटल  टँक),ब्रिटिशांनी विकसित केलेले शेरमन क्रॅब असे विविध प्रकारचे रणगाडे व जुन्या काळातील लष्करी वाहने ठेवण्यात आली आहेत.त्या पैकी बहुतेक लष्करी वाहने व  रणगाडे यांचा वापर पहिल्या व दुसर्या महायुध्दात करण्यात आला होता.भारतीय लष्करात मोलाची कामगिरी बजावणारा विजयंता रणगाडा भारतीय सेनेच्या अतुलनीय  साहसाची साक्ष देतांना येथे दिसतो.त्या काळात अतिशय मारक क्षमता असणारी ही लष्करी वाहने आज देखील प्रेरणादायी ठरत आहेत.1971 च्या युध्दात  पाकिस्तानी सैन्याला पराभूत केल्यानंतर भारतीय सेनेने मिळविलेले पॅटन सारखे रणगाडे व देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात जालियानवाला बाग येथे जनरल डायर ने  जनतेवर क्रुरपणे गोळ्या झाडून हजारो लोकांची कत्तल करतांना वापरलेली रोल्स रायल्स ही चिलखती गाडी देखील येथे ठेवण्यात आली आहे.
रणगाडा संग्रहालयात 3 ते 4 दालनांमध्ये लष्कराच्या इतिहासा विषयी तसेच अतुलनीय साहस व शौर्य बजावून विजय मिळवून देणारे अधिकारी व जवान यांची माहिती  देखील संकलित करून ठेवण्यात आली आहे. 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त रणगाडा संग्रहालय नागरिकांसाठी खुले ठेवण्यात आले होते.तसेच संग्रहालयाच्या  परिसरात स्वातंत्र्य दिनानिमित्त आर्मर्ड कोअर सेंटर अँड स्कूलच्या पाईप एवम ड्रम बँड वादनाचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्य दिनाच्या ऐतिहासिक  पार्श्‍वभूमीवर लष्करी बँडने सादर केलेल्या देशभक्तीपर गितांनी उपस्थित दर्शक श्रोत्यांना अक्षरश: मंत्रमुग्ध केले.