Breaking News

जागतिक ब्रिज स्पर्धेत भारताची दमदार कामगिरी

नाशिक, दि. 24, ऑगस्ट - फ्रान्समधील लायोन येथे झालेल्या 43व्या ब्रिज चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय खेळाडू दमदार कामगिरी करत आहेत. या स्पर्धेत  भारताच्या वरिष्ठ गटाने सहभाग घेतला असून हा गट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या भारताच्या संघाने आपले प्राथमिक सामने  जिंकून बाद फेरीत प्रवेश केला. बाद फेरीच्या उपउपांत्य फेरीत भारताची गाठ यजमान फ्रान्स संघाबरोबर पडली. या सामन्यात भारताच्या खेळाडूंची सुरवात फारशी  चांगली झाली नाही. सहा डावाच्या या सामन्यात पहिल्याच डावात भारताच्या संघाला 20 विरुद्ध 81 गुण अश्या 61 गुणांच्या मोठ्या फरकाने फ्रान्सने मागे टाकले.  परंतु डळमळून न जात भारताच्या खेळाडूंनी त्यानंतर चांगल्या खेळाचे प्रदर्शन करत पुढच्या प्रत्येक डावात चांगला खेळ करत फ्रान्सची आघाडी कमी करण्याचा सुंदर  प्रयत्न केला. त्यात अत्यंत यश मिळाले. भारताने दुसर्‍या डावात 26गुण तिसर्‍या डावात 34 गुण, चवथ्या डावात 33 गुण, पाचव्या डावात 18 गुण मिळवून फ्रान्सची  आघाडी कमी कमी करण्याचा प्रयत्न केला. आणि शेवटच्या सहाव्या डावात तब्बल 44 गुण कमावत यजमान फ्रान्सवर 175 विरुद्ध 162 अश्या 13 गुणांनी आघाडी  घेत हा उपउपांत्य सामना जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला. या सामन्यात खेळतांना भारताचा कर्णधार दिपक पोद्दार, पी. ए. अग्रवाल, जितेंद्र सेलानी,सुभाष धाक्रस,  पी. श्रीधरन. आणि अनंत सामंत यांनी सुंदर खेळ करून हा ऐतिहासिक विजय मिळविला. भारताच्या या खेळाडूंना
प्रशिक्षक अनिल शहा यांचे चांगले मार्गदर्शन मिळाले. जागतिक स्पर्धेतील उपांत्य फेरी गाठणे हेब्रीज या खेळात भारतासाठी आत्तापर्यंतचा सर्वात मोठा पल्ला आहे आता  उपांत्य फेरीत भारताचा सामना इटली संघाशी होणार असून दुसर्‍या उपांत्य सामन्यात युनाइटेड स्टेट ऑफ अमेरिका आणि स्वीडन हे एकमेकांशी भिडणार आहेत.  अत्यंत रोमहर्षक झालेल्या उपउपांत्य सामन्यात भारताने यजमान फ्रान्सला पराभूत केल्यामुळे भारताच्या खेळाडूंचा आत्मविश्‍वास वाढला आहे. त्यामुळे भारताचा संघ  इटलीविरुद्ध होणार्‍या उपांत्य सामन्यातही चांगली कामगिरी करून अनंतें फेरी गाठण्याचा प्रयत्न कराल असा विश्‍वास भारताचे प्रशिक्षक अनिल शहा यांनी व्यक्त केला  आहे.