Breaking News

राजदेरवाडीचा गाव तलाव ‘गाळमुक्त’ तर शिवार झाले ‘जलयुक्त’

नाशिक, दि. 09 - चांदवड तालुक्यातील राजदेरवाडी गावात ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेच्या माध्यमातून गावतलावातून 13 हजार घनमीटर गाळ  काढल्याने पाणीसाठ्यात 13 टीसीएम वाढ झाली आहे.
पाझर तलावाची 1971-72 मध्ये निर्मिती झाल्यापासून त्यात सातत्याने गाळ साचत गेल्याने पाणी साठवणाच्या क्षमतेचे प्रमाण कमी झाले होते. त्यामुळे उन्हाळ्यात  ग्रामस्थांना टंचाईचा सामना करावा लागत असे.
पाण्याची टंचाई कायमस्वरुपी दूर करण्यासाठी 2015-16 पासून ग्रामस्थांनी लोकसहभागातून प्रयत्न सुरू केले. पाझर तलावातील गाळ काढण्य मोठ्या प्रमाणात  करण्यात आले. यावर्षी ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेअंतर्गत आर्ट ऑफ लिव्हींगच्या सहकार्याने 13 हजार क्युबिक मीटर गाळ काढण्यात आला. या  कामाचा शुभारंभ जलसंधारणमंत्री प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते जून महिन्यात करण्यात आला.
आर्ट ऑफ लिव्हींगने एक जेसीबी यंत्र उपलब्ध करून दिले. डिझेलचा एक लाख 60 हजार खर्च ग्रामस्थांनी मिळून केला. गाळ शेतात वाहून नेण्यासाठी ग्रामस्थांनी  एकूण 60 ट्रॅक्टर उपलब्ध करून दिले होते. गाळ काढण्यात आल्याने पाणीसाठ्यात 13 टीसीएम एवढी वाढ झाली आहे.
यावर्षी गावाची निवड जलयुक्त शिवार अभियानाच्या कामासाठी करण्यात आली आहे. शिवार फेरी घेऊन कामाच्या निश्‍चितीचे काम सुरू करण्यात आले आहे.  तलावातील वाढलेले पाणी पाहून ग्रामस्थांचा उत्साह वाढला आहे. गाव ‘जलयुक्त’ होऊन टंचाई कायमस्वरुपी दूर होण्याच्या दिशेने हे प्रयत्न उपयुक्त ठरणार आहेत.