Breaking News

बनावट नोटा प्रकरणाचा तपास एटीएसकडे

हिंगोली, दि. 27, ऑगस्ट - हिंगोली शहर पोलिसांनी पकडलेल्या बनावट नोटांचा तपास आता एटीएस करत असल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले असून त्याबाबत  मोठी चर्चा जिल्ह्यात चालू आहे. दि. 17 ऑगस्ट रोजी एका कारमधून 94 हजार 300 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करत पोलिसांनी चार जणांना अटक केली होती.  या बनावट नोटांचा तपास आता टीएसही करीत असल्याने या प्रकरणाबाबत उलटसुलट चर्चा चालू आहे. याबाबत अधिक माहिती अशी की हिंगोली शहर पोलिसांनी  गुरुवारी रात्री गस्तीवर असताना पांढर्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार (एमएच-31- सीए- 3900) अडविली. वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये 94 हजार  300 रुपयांच्या बनावट नोटा आढळल्या. पोलिसांनी सय्यद महेमूद सय्यद मकसूद कादरी (रा. शहर किल्ला, ता. बाळापूर), शेख मोहसीन शेख मुक्तार (रा. बाळापूर  नाका, जुने शहर), मो. साकीब मो. आयुब (रा. शिक्षक कॉलनी, के. एन. महाविद्यालय रोड, कारंजा, जि. वाशीम) या तिघांना अटक केली. या तिघांकडून  मिळालेल्या माहितीनुसार नागपूर क्राईम ब्रँचचे सहकार्य घेत सूत्रधाराला अटक करण्यात आली. आता या प्रकरणाची चौकशी दहशतवाद विरोधी विभागाने (एटीएस)  सुरू केली आहे. यासंदर्भात एटीएसच्या अधिका-याने तपास सुरू आहे असे सांगून अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे.