Breaking News

भोसरी महोत्सव 2017 चे आयोजन

पुणे, दि. 27, ऑगस्ट - गणपती उत्सवानिमित्त भोसरी कला क्रीडा मंचच्या वतीने सोमवारपासून (दि. 28) भोसरी महोत्सव 2017 चे आयोजन करण्यात आले  आहे. गुरुवारपर्यंत (दि. 31) सुरू राहणार्‍या या महोत्सवात नाटक, कवी संमेलन, नृत्य स्पर्धा, फॅशन शो आणि लावणी असे विविध कार्यक्रम होणार असल्याची  माहिती मंचचे अध्यक्ष नगरसेवक अ‍ॅड. नितीन लांडगे यांनी दिली.
भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात हा महोत्सव होणार आहे. महोत्सवाबाबत अधिक माहिती देताना मंचचे अध्यक्ष अ‍ॅड. लांडगे म्हणाले, दरवर्षी महोत्सवाच्या  माध्यमातून पिंपरी चिंचवड शहरातील स्थानिक कलाकारांना वाव मिळावा या उद्देशाने प्रयत्न केले जातात व तशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन मंचच्या वतीने केले  जाते. यंदाचे महोत्सवाचे अकरावे वर्ष आहे.
महोत्सवाचे उद्घाटन सोमवारी सायंकाळी सहा वाजता महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी आमदार महेश लांडगे, अभिनेते प्रदीप पटवर्धन  उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी सात वाजता अभिनेते प्रदीप पटवर्धन अभिनीत ’बायांनो नवरे सांभाळा’ हे नाटक होणार आहे. मंगळवारी (दि.29) सायंकाळी  पाच वाजता कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी निमंत्रित कवींसह उपस्थित कवींचे कवी संमेलन होणार आहे.
यानंतर बुधवारी (दि.30) सकाळी अकरा आंतरशालेय, अकादमी नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी पाच वाजता फॅशन शोचे आयोजन करण्यात  आले आहे. गुरुवारी (दि.31) सायंकाळी सहा वाजता नृत्यांगना नयन महाजन व प्रियांका कुलकर्णी यांचा ’हीच ती शुक्राची चांदणी’ हा लावणी व मराठी लोकगीतांचा  कार्यक्रम होणार आहे. अ‍ॅड. नितीन लांडगे यांच्यासह कार्याध्यक्ष विजय फुगे, उपाध्यक्ष भरत लांडगे, भाऊसाहेब डोळस, समन्वयक विजय लांडगे आदींनी संयोजनात  पुढाकार घेतला आहे.