Breaking News

राज्यातील शाळांना स्वच्छता पंधवडा साजरा करण्याबाबत शिक्षण विभागाकडून सूचना

पुणे, दि. 09 - विद्यार्थी शाळांमध्ये जर शौचालयाचा वापर करत असतील व घरी उघड्यावर शौचास बसत असतील तर शिक्षणाला काहीच अर्थ उरत नाही असे  सांगत शिक्षण विभागाने स्वच्छता पंधवड्याच्या निमित्ताने शिक्षकांना एक नविन टास्क दिला आहे. विद्यार्थ्यांना शौचालयाचा वापर करण्यास, नविन शौचालय बांधण्यास  प्रवृत्त करावे. त्यांच्या नातेवाईक व मित्रमैत्रिणींना शौचालयाचा वापर करण्यासाठी मार्गदर्शन करावे असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. 
शिक्षण विभागाने राज्यातील शाळांना 1 सप्टेंबर ते 15 सप्टेंबरदरम्यान स्वच्छता पंधवडा साजरा करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्या अंतर्गत शिक्षकांनी  विद्यार्थ्यांसाठी कोणकोणते उपक्रम राबववावेत याची माहिती दिली आहे. यामध्ये स्वच्छता विषयक उपकरणांची तपासणी, चित्रकला, वादविवाद स्पर्धा, शाळांच्या  संकेतस्थळावर स्वच्छतेविषयक माहिती, शाळेची स्वच्छता, प्रचार फेरी आदी उपक्रम राबविण्यास सांगितले आहे. यामध्ये जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत स्तरावर स्वच्छ  शौचालय स्पर्धा राबवविण्याबाबतही सूचना करण्यात आल्या आहेत. शासन निर्णयात दिलेल्या माहितीनुसार पालघर जिल्ह्यातील करंज्याचापाडा व ठाणे जिल्ह्यात  खैरपाडा या शाळेत शिक्षकांनी असे प्रयोग साध्य केले आहेत. शाळांनी विद्यार्थ्यांना केवळ शौचालय नाही तर घन व द्रव कचरा व्यवस्थापनही शिकवावे असे सांगितले  आहे. राज्यातील 1 हजार प्रगत शाळांमधील 100 टक्केथ विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेच्या सवयी रुजतील यासाठी की रिजल्ट एरिया (केआरए) ठरविण्यात आला आहे. या  सर्व उपक्रमांची माहिती शगुन पोर्टलवर अपलोड करावी अशाही सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत.