Breaking News

पुणे महापालिकेतर्फे शहरात लवकरच स्वतंत्र वैद्यकीय महाविद्यालय

पुणे, दि. 09 - मुंबई महापालिकेच्या धर्तीवर पुणे महापालिकेतर्फे शहरात लवकरच स्वतंत्र वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. त्यासाठी अतिरिक्त  आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांच्या सहा प्रमुख अधिकार्‍यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. याशिवाय प्रस्तावित महाविद्यालयाचा आराखडा तयार  करण्यासाठी सल्लागाराचीही नियुक्ती करण्यात येणार आहे. 
महापालिकेच्या वतीने शहरात स्वतंत्र वैद्यकीय महाविद्यालय आणि नर्सिंग महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. त्यासाठी पुणे महापालिकेच्या 2017 -18 च्या  अंदाजपत्रकात 20 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. बंडगार्डन रस्त्यावरील डॉ. नायडू रुग्णालयाच्या आवारात हे महाविद्यालय प्रस्तावित आहे. त्याच्या  उभारणीसाठी पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य अधिकारी, सहायक आरोग्य अधिकारी, भवन विभाग प्रमुख, मालमत्ता  आणि व्यवस्थापन विभागाचे प्रमुख, विधि विभाग प्रमुख आणि नगर अभियंता या सहा अधिकार्‍यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. भारतीय वैद्यक परिषदेकडे  (एमसीआय) महाविद्यालयाचा प्रस्ताव पाठवून त्यांची मंजुरी घेतली जाणार आहे. याशिवाय महाविद्यालयाचा आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार नेमण्यात येणार  आहे, अशी माहिती आरोग्य उपप्रमुख डॉ. अंजली साबणे यांनी दिली.