Breaking News

मोदी सरकारकडून डॉक्टरांसाठी लवकरच नवा नियम

मुंबई, दि. 03, ऑगस्ट - औषध कंपन्यांसाठी भारत ही एक मोठी बाजारपेठ आहे. त्यासाठी अनेक औषध कंपन्या या आपल्या उत्पादनांचा खप व्हावा यासाठी  प्रयत्नशील असतात. अशावेळी त्यांच्याकडून डॉक्टरांना महागड्या भेटवस्तू, परदेश दौरे अशा गोष्टी दिल्या जातात. पण आता या सर्व प्रकारांवर बंदी आणण्याचा  सरकारचा विचार सुरु आहे. यापुढे 1000 रुपयांपेक्षा अधिक किंमतीच्या भेटवस्तू डॉक्टरांना न देण्याचा नियम तयार करण्यात येणार असल्याचं वृत्त रॉयटर्सनं दिलं  आहे. या नियमाचा मसुदाही तयार केला गेला असल्याचं समजतं आहे. दरम्यान, अनेक देशामध्ये अशाप्रकारचा नियम असून त्याचं पालनही केलं जातं. औषधांच्या  अवैध विक्रीवर बंदी यावी यासाठी अनेक दिवसांपासून मागणी करण्यात येत आहे.
डॉक्टर आणि फार्मासिस्टना काही औषध लिहून देण्यासाठी किंवा त्याचा साठा करण्यासाठी औषध निर्मात्यांकडून प्रोत्साहित केलं जातं. त्यामुळे त्यांना भेटवस्तू  दिल्या जातात. या प्रकाराला आळा बसावा यासाठी आता सरकार नवा नियम आणणार असल्याचं समजतं आहे. ‘भारतात डॉक्टरांमध्ये भ्रष्टाचार आणि लाचखोरी  मोठ्या प्रमाणात असा आहे. मी बर्‍याचदा पाहिलं आहे की, अनेकदा डॉक्टरांना परिषदेच्या नावाखाली थायलंडला नेलं जातं.’ असा धक्कादायक आरोप प्रसिद्ध डॉक्टर  समीरन नंदी यांनी केला आहे. ‘या प्रकारांना आळा बसावा यासाठी नियमावर तयार करण्यात येत आहेत. पण भारतामध्ये अनेक नियम आहेत जे अंमलात आणले  जात नाही. पण मला आशा आहे की, हा नियम लवकरच अंमलात येईल.’ असंही डॉक्टर समीरन म्हणाले.
अनेक मोठ्या औषध कंपन्या या आपल्या प्रमोशनसाठी लाखो रुपये डॉक्टरांवर खर्च करतात. काही कंपन्या आपल्या एकूण कमाईपैकी 20 टक्के प्रमोशनवर खर्च  करतात. त्यामुळे हा खर्च ते थेट औषधांचा किंमतीत जोडतात. त्यामुळे नवा नियम लवकरच डॉक्टर, औषध कंपन्या आणि विक्रेत्यांना लागू होईल. जर कोणी या  नियमाचं उल्लंघन केलं तर त्याला दंडही ठोठावण्यात येणार आहे. तसेच शिक्षाही दिली जाऊ शकते.