Breaking News

मुंबईतील मराठा मोर्चाची जोरदार तयारी, गर्दीचा विक्रम मोडणार?

मुंबई, दि. 08, ऑगस्ट - एक मराठा लाख मराठा अशी घोषणा देत 9 ऑगस्टला म्हणजेच उद्या मुंबईत मराठा क्रांती मोर्चा निघणार आहे. आतापर्यंत राज्यभरात  झालेल्या मोर्चांपेक्षा मुंबईतल्या मोर्चात सर्वाधिक गर्दी उसळेल असा दावा आयोजक करत आहेत. मराठा आरक्षण, कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपीला फाशीची  शिक्षा, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा अशा विविध मागण्यांची पुनरावृत्ती मुंबईतल्या मराठा क्रांती मोर्चाद्वारे करण्यात येणार आहे. मात्र ही फक्त मागणी नसून एल्गार  असेल असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या आयोजकांनी दिला आहे.
या भव्य मोर्चासाठी मराठा संघटनांची जोरदार तयारी सुरु आहे. शिवाजी पार्कमध्ये मराठा संघटनांचं डिझास्टर मॅनेजमेंट सेल काम करतं आहे. ही टीम मराठा मोर्चात  कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची काळजी घेणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
9 ऑगस्टला सकाळी 11 वाजता भायखळ्यातील जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा मोर्चा काढण्यात येईल. त्यासाठी आतापर्यंत टोल फ्री क्रमांकाच्या  माध्यमातून 5 लाखांपेक्षा अधिक लोकांशी संपर्क साधण्यात आला आहे. फेसबुकच्या माध्यमातून 23 लाख 53 हजार जणांपर्यंत मोर्चाची माहिती देण्यात आली आहे.  व्हॉट्सअ‍ॅप आणि ट्विटरच्या मदतीने मोर्चाच्या कार्यक्रमाची माहिती देणारे पोस्टर्स व्हायरल केले जात आहेत.
या मोर्चासाठी ठाणे, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, औरंगाबाद, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यातला मराठा बांधव एकवटणार आहे. त्यामुळे मुंबई आणि  लगतच्या उपनगरामधील रेल्वे स्टेशनवर ‘रेल मराठा स्वयंसेवक’ तैनात ठेवण्यात येतील. तसंच मराठा मोर्चात सामील होणार्‍या वाहनांसाठी बीपीटी सिमेंट यार्ड आणि  वडाळा ट्रक टर्मिनल येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. मोर्चासाठी बाहेरुन येणार्‍यांना मार्गदर्शन करण्यासाठी 5 हजार स्वयंसेवकाची फौज सज्ज असेल.  पुणेमार्गे मुंबईत येणार्‍या लोकांसाठी पनवेल, कामोठे, खारघर, बेलापूर, जुईनगर, सानपाडा, वाशी तसेच ठाणे ऑक्ट्रॉय नाका, भाईंदर या ठिकाणी विशेष सोय  करण्यात आली आहे.