Breaking News

जाचक अटी रद्द न केल्यास शिवसेना स्टाइल आंदोलन

नाशिक, दि. 23, ऑगस्ट - उच्च न्यायालयाने जनहित याचिकेनावणीत दिलेल्या निर्देशानूसार यंदा सार्वजकिक गणेशमंडळांवर अनेक बंधने टाकण्यात  आली. शिवसनेने याचा निषेध नोंदवला आहे. या जाचक अटींमुळे नागरिकांनी हिंदु सण साजरे करूच नयेत अशी प्रशासनाची भुमिका आहे का असा संतप्त  सवाल शिवसैनिकांनी उपस्थित केला.
जाचक अटी शिथील न करता अंमलबजावणीचा रेटा प्रशासनाने कायम ठेवला तर शिवसैनिक आपल्या स्टाईलने प्रत्युत्तर देतील असा सणसणीत इशारा  शिवसेना पदाधिका-यांनी मंगळवारी जिल्हा प्रशासनाला दिला. कारवाईचा धाक दाखविणा-या शहर पोलिसांनाही जिल्हाधिका-यांनी समज द्यावी असेही  यावेळी ठणकावून सांगण्यात आले.
मंडप उभारणी, लाऊडस्पीकरवरील आवाजाची मर्यादा, मंडळांना परवानगीच्या जाचक अटी यांमुळे गणेश मंडळांचे कार्यकर्ते मेटाकुटीला आले आहेत.  महापालिका प्रशासनाने गणेशोत्सव मंडळांच्या जागेचे शुल्क यंदा वाढविले असून रस्त्यावर साज-या होणा-या गणेशोत्सवावर अनेक जाचक अटी लावण्यात  आल्या आहेत. जिल्हाधिका-यांनी महसूल, महापालिका, पोलिस अधिका-यांचा समावेश असलेले पथक तयार केले असून हे पथक गणेश मंडळांवर दबाव  आणण्याचे काम करीत आहे.
डिजे चालकांना साऊंड सिस्टीमबाबत दिलेली मर्यादा तर अत्यंत हास्यास्पद असल्याचा दावा शिवसैनिकांनी केला आहे. ही मर्यादा ठरावीक अंतरावरून  तपासणे गरजेचे असताना थेट स्पीकरपर्यंत जाऊन तपासली जाते. सामान्य आवाजही 60 डेसीबलपर्यंत असतो. त्यामुळे 65 डेसीबलची मर्यादा ही गणेश  भक्तांची चेष्ठा असल्याबद्दल यावेळी संताप व्यक्त करण्यात आला.
हिंदु संस्कृतीतील सणांमुळे एकोपा, शांतता तसेच कायदा सुव्यवस्था टिकून राहाते. परंतु गेल्या काही महिन्यांपासून हिंदुंच्या सणांवरील निर्बंध वाढत आहेत.  अशा गैरवाजवी निर्बंधांचा यावेळी निषेध करण्यात आला. यावेळी गटनेते विलास शिंदे, नगरसेवक डि.जी. सुर्यवंशी, शामकुमार साबळे, संतोष गायकवाड,  रमेश धोंगडे, चंद्रकांत खाडे, प्रशांत दिवे आदि उपस्थित होते.