खासदार खैरे यांच्या खासदार निधीतील कामे बोगस !
औरंगाबाद, दि. 01, ऑगस्ट - खा.चंद्रकांत खैरे यांच्या खासदार निधीतील कामे बोगस झाल्याच्या आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या तक्रारीत तथ्य आढळून येत असले तरी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधीक्षक अभियंत्यांच्या अहवालानंतर संबंधितांवरची कारवाई अपेक्षित आहे. हे अधीक्षक अभियंता काय अहवाल देतात, किती दिवसांत देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे. कन्नड तालुक्यातील देभेगाव व आलापूरमधील 15 पैकी 9 कामे झालीच नसल्याचे कन्नडचे उपविभागीय अधिकारी श्रीमंत हरकर यांनी जिल्हाधिकार्यांना सादर केलेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात बोलताना जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी सांगितले की, चौकशी अहवालानुसार कामांमध्ये अनियमितता आढळून आलेली आहे. काही कामे झालेलीच नाहीत. त्यामुळे संबंधित अधिकार्यांवर कारवाई केली जाईल. तसेच बांधकाम विभागाची जी कामे झाली नाहीत, त्याबाबत अधीक्षक अभियंत्यांकडून अहवाल मागविण्यात आला आहे. तीन दिवसांत हा अहवाल यायला पाहिजे. त्यानंतर संबंधित विभागाच्या सचिवांनादेखील अहवाल पाठविला जाईल आणि दोषी अधिकाड्ढयांवर कारवाई केली जाईल. आ. हर्षवर्धन जाधव यांनी खा. चंद्रकांत खैरे यांच्यावर बोगस कामे केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी राम यांनी कन्नडच्या उपविभागीय अधिकार्यांमार्फत दोन गावांतील कामांची चौकशी करून घेतली. नुकताच चौकशीचा अहवाल प्राप्त झाला आणि एकच खळबळ उडाली. देभेगावात तीन कामे झाली नसल्याचे उघड झाले.