पंतप्रधान आवास योजनेसाठी सिल्लोड नगर परिषदेची निवड
औरंगाबाद, दि. 01, ऑगस्ट - केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेसाठी सिल्लोड नगर परिषदेची निवड झाली आहे. या योजनेतून शहरातील प्रत्येक बेघरांना घर बांधण्यासाठी अर्थसहाय्य मिळणार असल्याने आता बेघरांचे सुंदर घराचे स्वप्न साकार होणार आहे. शुक्रवार (दि.28) रोजी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात याबाबत बैठक संपन्न झाल्याची माहिती आ.अब्दुल सत्तार यांनी दिली. शासनाच्या निकषाप्रमाणे यापूर्वी केवळ ’अ’ दर्जा प्राप्त नगरपरिषदेला ग्राह्य धरून राज्यात फक्त 51 शहराचा समावेश करण्यात आला होता. मात्र आ. अब्दुल सत्तार यांच्या पाठपुरावामुळे या निकषात बदल करण्यात आला. यामुळे या योजनेत सिल्लोडचाही समावेश आहे. 20 वर्षांपूर्वी आ. सत्तार हे नगराध्यक्ष असताना कुटुंबांना इंदिरा गांधी आवास व इतर योजनेतून नगर परिषदेने अनेकांना घरे दिली होती. त्यानंतर रमाई घरकुल योजनेतून दलित बांधवांना घरकुलाचा लाभ देण्यात आला. आता पुन्हा या योजनेतून प्रत्येक कुटुंबाला आता घरबांधण्यासाठी भरीव आर्थिक लाभ मिळणार आहे.