Breaking News

पदवीधर नोंदणीला मुदतवाढ; नागपूर विद्यापीठाचा निर्णय

नागपूर, दि. 29, ऑगस्ट - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात पदवीधर नोंदणीला पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. तांत्रिक कारणांमुळे पदवीधरांना  नोंदणी करण्यात अडचणी येत असल्याचे मान्य करत विद्यापीठाने 5 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली.
नागपूर विद्यापीठांतर्गत पदवीधर नोंदणीचा कार्यक्रम 12 जुलै 2017 पासून सुरू करण्यात आला. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार 11 ऑगस्ट 2017 हा नोंदणीची  अखेरची तारिख होती. मात्र विविध कारणांमुळे नोंदणी रखडल्यामुळे 28 ऑगस्टपर्यंत प्रशासनाने मुदतवाढ दिली होती. ऑनलाईन शुल्क तसेच अर्ज डाऊनलोड  करण्याची लिंक उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन देखील विद्यापीठाने दिले होते. परंतु, अनेकांना भरलेल्या अर्जाची प्रिंट आऊट काढायला अडचणी येत आहेत.  काही पदवीधरांनी मोबाईलवरून अर्ज भरला. प्रत्येक वेळी लगेच प्रिंटआऊट काढणे शक्य नसते. अर्ज सेव्ह करून नंतर प्रिंटआऊट काढण्यासाठी लिंकच उपलब्ध  होत नसल्याचे दिसून आले. ई शुल्कासंदर्भात निवडणुकांचे ऑनलाईन काम सांभाळणार्‍या कंपनीने सादरीकरण देखील दिले होते व सुरुवातीचे काही दिवस ऑनलाईन  शुल्क सहज भरता आले. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर त्यासाठी वेगळी लिंक देखील दिली. डेबिट कार्ड किंवा थेट नेट बॅकिंगद्वारे पैसे भरण्याची सोय होती. मात्र  मागील आठवड्यापासून सर्व माहिती भरल्यानंतर पैसे भरण्यासाठी क्लिक केल्यावर पेमेन्ट प्रोसेसिंग फेल असाच संदेश येत आहे.