30 वर्षाच्या प्रतिक्षेनंतर हर्सुलकरांना अखेर जायकवाडीचे पाणी
औरंगाबाद, दि. 01, ऑगस्ट - तब्बल 30 वर्षांपासून जायकवाडीतील पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या हर्सूलकरांना अखेर दिलासा मिळाला आहे. मनपाने 25 लाख रुपये खर्चून एक कि.मी.पर्यंत 250 व्यासाची जलवाहिनी टाकली. दररोज पाच लाख लिटर पाणी या भागासाठी मिळणार आहे. येथील वसाहतींना टप्प्याटप्प्याने चार दिवसांआड पाणीपुरवठा होणार असून यामुळे 25-30 हजार नागरिकांचा पाणीप्रश्न मार्गी लागला आहे. या योजनेचा शुभारंभ रविवारी विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते झाला. हर्सूल गावाचा समावेश तीन दशकांपूर्वी महानगरपालिका हद्दीत झाला. वर्षानुवर्षे येथील नागरिक हर्सूल-सावंगी येथील विहिरीच्या पाण्यावर तहान भागवत होते. शहराप्रमाणे हर्सूल गावालाही जायकवाडीचे पाणी द्यावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून होती. विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी यात लक्ष घातले. तत्कालीन मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी हर्सूल कारागृहाजवळ 20 वर्षांपूर्वी मनपाने जलकुंभ बांधला होता तेथून गावापर्यंत मोठी जलवाहिनी टाकून पाणीपुरवठा करावा, असे आदेश दिले. अखेर दोन दिवसांपूर्वी मनपा प्रशासनाने हे काम पूर्ण केले. शुभारंभप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, सभापती गजानन बारवाल, कृउबास सभापती संजय औताडे, नगरसेवक गोकुळ मलके, विजय औताडे, पूनम बमने, महेश माळवतकर, सर्जेराव मेटे, शिवाजी पाथ्रीकर, कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल, उपअभियंता अशोक पद्मे, मोहन हरणे, राजेश देशमुख, रंगनाथ हरणे, साईनाथ हरणे, राजू तुपे, अन्वर कादरी, मंगेश वाघुले, दिलीप औताडे आदींची उपस्थिती होती.