Breaking News

कोवळ्या मनावर पर्यावरण रक्षणाचा संस्कार करण्याचा निर्धार - तडवळकर

अहमदनगर, दि. 25, ऑगस्ट - पर्यावरण रक्षणाचा संदेश नव्या पिढीला योग्य वयात देत त्यांच्यात निसर्गाविषयी प्रेम आणि पर्यावरण विषयक जागृती निर्माण करणे  अत्यावश्यक आहे. प्रदूषण टाळण्यासाठी मातीचा गणपती बनवण्याचे प्रशिक्षण मुलांना देत त्यांच्या कोवळ्या मनावर पर्यावरण रक्षणाचा संस्कार करण्याचा निर्धार  शेवगाव  रोटरी व इनरव्हीलने केला आहे, असे प्रतिपादन शेवगाव इनरव्हीलच्या रुपाली तडवळकर यांनी केले.
शहराच्या सामाजिक चळवळीत अग्रभागी असणार्या रोटरी क्लब ऑफ शेवगाव सिटी, इनरव्हील क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने  शेवगावमधील पद्मभूषण बाळासाहेब  भारदे हायस्कूल व रेसिदेन्शिअल हायस्कूलच्या भारदे हायस्कूलच्या रावसाहेब पटवर्धन सभागृहामध्ये ’पर्यावरण पूरक गणपती बनवा’  या कार्यशाळेचे आयोजन  करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. बाळासाहेब भारदे हायस्कूलचे कलाशिक्षक अशोक कदम यांनी या कार्यशाळेसाठी मार्गदर्शन  केले.  या कार्यशाळेत दोनशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्वतः तयार केलेल्या गणेश मूर्तींची घरच्या गणपती उत्सवात प्राणप्रतिष्ठा करणार असल्याचे सहभागी  मुला-मुलींनी सांगितले. प्रा. गोरक्ष बडे, दिलीप फलके, योगेश जाधव, मदन मुळे डॉ. प्रीती राठी, भाविका आर्य, वसुधा सावरकर डॉ. लड्डा आदींनी या कार्यशाळेचे  आयोजन केले.