Breaking News

संगमनेर महाविद्यालयातील छात्रांची भारतीय सैन्यदलात भरती

संगमनेर दि. 29 (प्रतिनिधी):- युवकच भारताचे खंबीरपणे नेतृत्व करु शकतात. ती ताकद युवाशक्तीत आपत्तीकालीन प्रंसगी देखील अनुभवास आली आहे. म्हणून एन. सी. सी. च्या विद्यार्थ्यांनी अनुशासन व शिस्तप्रियतेबरोबरच राष्ट्रउभारणीसाठी प्रयत्नशील रहावे, असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के.के. देशमुख यांनी केले. 
संगमनेर  महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेमधील नऊ एन. सी. सी. छात्रांची भारतीय सैन्यदलात निवड झाली.  त्यांनी मिळविलेल्या उल्लेखनीय यशाबद्दल एन. सी. सी. विभागामार्फत गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  प्राचार्य डॉ. के.के. देशमुख बोलत होते. व्यासपीठावर उपप्राचार्य कॅप्टन डॉ. अरुण एच. गायकवाड, उपप्राचार्य श्रीहरी पिंगळे, उपप्राचार्य डॉ. रविंद्र ताशिलदार व प्रा. हेमलता तारे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. देशमुख म्हणाले, एन. सी. सी. च्या माध्यमातून उद्याच्या जगाचा चांगला व सक्षम युवक घडत असतो.  या छात्रांनी आपल्या अथक परिश्रमातून, चिकाटीने, जिद्दीने व आपल्या देशाला योगदान देण्याच्या भावनेने यश संपादन केले व भारतमातेची सेवा करण्यासाठी मिळालेल्या संधीचे सोनं करुन देशाबरोबर संगमनेर महाविद्यायलयाचे नाव उज्ज्वल करेल असा विश्‍वास व्यक्त केला.
आपल्या प्रास्ताविकात बोलताना एन. सी. सी. अधिकारी उपप्राचार्य डॉ.अरुण गायकवाड म्हणाले, एन. सी. सी. स्वयंशिस्तीमुळे महाविद्यालयाला एक आगळे वेगळे रुप प्राप्त होते. समर्पण, त्याग, शिस्त व देशप्रेम या गुणांनी युक्त असलेल्या एन. सी. सी. मधील छात्रांच्या या उल्लेखनीय यशामुळे महाविद्यालयास व आम्हास सार्थ अभिमान असल्याचे सांगुन एन. सी. सी. छात्रांचे कौतुक केले.
उपप्राचार्य प्रा. श्रीहरी पिंगळे म्हणाले, देशाची सद्यस्थिती व भविष्यात येणारी आव्हाने पाहता देशसेवेसाठी आपण नेहमीच तत्पर राहिले पाहिजे. आज भारतीय सैन्याचे लघुरुप म्हणुन राष्ट्रीय छात्र सेनेकडे पाहीले जाते.
याप्रसंगी सैन्यदलात निवड झालेल्या एन. सी. सी. छात्र सोन्याबापु सरोदे, गणेश वनवे, प्रकाश बोर्‍हाडे, विनोद औटी, रामेश्‍वर शिंदे, सागर शेरमाळे, तुषार घुले यांचा प्राचार्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनासाठी एन. सी. सी. अंडर ऑफिसर, ज्युनिअर अंडर ऑफिसर व अक्षय कुमकर यांनी विशेष परिश्रम घेतले.