Breaking News

विद्यापीठांतील घोळ !


राज्यातीलच नव्हे तर देशभरातील विद्यापीठे हे सावळया गोंधळाचे प्रतिक बनले आहे. विद्यापीठ म्हणजे उच्च शिक्षणांचे केंद्र. तेथील कारभार हा पारदर्शक, सुनियोजित आणि सुसूत्रता असणारा असावा. मात्र अलीकडच्या काही वर्षात बघितले असता विद्यापीठे अनेक कारणांमूळे चर्चेत आहे. जी चर्चा विद्यापीठांच्या हिताची नसून, भारतीय शिक्षणपध्दतीचा दर्जा खालावणारी असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. मागील काही दिवसांत मुंबई विद्यापीठातील निकालाचा घोळ समोर आला. जुलै महिना संपण्याच्या अखेर मुंबई विद्यापीठाने विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर न केल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे.
...................................................................................................................................

राज्यातील विद्यापींठाचा आढावा घेतल्यास प्रत्येक विद्यापीठ आपल्या सोयीनुसार निकाल लावत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे इतर विद्यापीठात प्रवेश घेण्याचे विद्यार्थ्यांचे नियोजन कोलमडून पडज असल्याचे दिसून येते. वास्तविक परीक्षांचे आणि निकांलाचे नियोजन विद्यापीठांच्या कुलगुरूंनी अगोदरच करायला हवे. मात्र हल्ली कुलगुंरूच्या निवडी देखील संशयास्पद आहेत. कुलगुरूंच्या होणार्‍या निवडी, त्यातील राजकीय हस्तक्षेप, यामुळे या पदावर बसणारी व्यक्ती, त्या पदाला योग्य न्याय देऊ शकेल का? हा महत्वाचा प्रश्‍न आहे. मुंबई विद्यापीठांतील कुलगुरू, जुलै महिना उजाडला, तरी निकाल लागला नाही, त्यावर उपायोजना करून, तोडगा काढण्याची जवाबदारी कुलगुंरूवर असतांना, ते शांत कसे बसू शकतात. कुलगुरू हा विद्यापीठाचा प्रमुख या नात्याने त्यांनी निकालाकडे जातीने लक्ष द्यायला हवे. मात्र परीक्षा विभागांवर जवाबदारी सोडून कुलगुरू आपल्या कॅबिनमध्ये बसून गप्पा सोडणारे कुलगुंरू आता तयार होत आहे. भारतीय शिक्षणांचा हल्लीचा दर्जा बघितला असता, शिक्षणपध्दतीत आपल्या आमुलाग्र बदल करण्याची वेळ  आलेली आहे. विद्यापीठातून दर्जेदार संशोधनाची अपेक्षा असतांना आजकाल हवेतसे संशोधन होत नाही. नावीन्यांचा अभाव असलेले, आणि पारंपारिक पध्दतीचा वापर करणारे शिक्षण आपल्या विद्यापीठातून झळकत असल्याचे दिसून येते. एक अथवा तोन तास शिकवत अव्वाच्या सव्वा पगार घेणारे प्राध्यापक मंडळी, यांची विद्यार्थ्यांप्रती कोणतीही जवाबदारी आणि दिशा देण्याचा कोणताच कार्यक्रम नसल्याचे दिसून येते. विद्यापीठांच्या प्रशासनाकडून देखील कोणतेच नियंत्रण नसल्यामुळे हा घोळ कायम आहे. महाविद्यालये असो की, विद्यापीठे, यांच्या कारभारावर अनेकवेळेस कोरडे ओढून देखील यांच्या कारभारात किंचितही फरक पडल्याचे दिसून येत नाही. परीक्षा वेळैवर होत नाही, झत्तल्याच तर त्यांचा निकाल वेळेवर लागत नाही, प्रवेशप्रक्रिया वेळेवर होत नाही.
पुढील शैक्षणिक वर्षाचे पहिले अर्धे सत्र संपत आले तरी निकाल न लागल्यामुळे महाविद्यालये वेळवर सुरू होत नाहीत. त्यामुळे विद्यार्थी धास्तावलेले आणि पालक गर्भगळीत झालेले, अशी अवस्था आहे. डिजीटललायझेशच्या युगात सर्व्हर अनेकदा डाऊन असल्यामुळे विद्यार्थ्यांची ताराबंळ उडते. शिक्षणक्षेत्राकडून नवीन प्रक्रिया राबविण्याच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी पुरेपूर खेळ करण्याचा प्रयत्न सुरू आहे. रोज नवीन घोषणा, नवीन पध्दती, याचा परिणात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कारकीर्दीवर होत आहे. मात्र याचे कोणतेच सोयरसुतक आमच्या प्रशासनाला, आणि सरकारला देखील नाही. मुंबई विद्यापीठातील निकाल लवकर लावण्यासाठी 31 जुलैची डेडलाईन विद्यापीठाला देण्यात आली होती. मात्र वेळेवर निकाल लावण्याच्या गोंधळापायी, पुन्हा अनेक चुका आमच्या विद्यार्थ्यांच्या नशीबी वाढवून ठेवल्या आहेत. डेडलाईनमुळे उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन योग्य पध्दतीने होईल का? ही शंका आम्हाला सतावत आहे. अनेक वर्ष अभ्यास करून, तीन तासात पेपर लिहिणार्‍या आमच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेला योग्य न्याय देण्यासाठी प्राध्यांपकाकडे वेळेच्या मर्यादामुळे काही मिनिटांत त्यांचा पेपर निकाली काढण्यात येणार. परत पुर्नमूल्यांकन करायचे म्हटले, तर तेवढा वेळ विद्यार्थ्यांकडे देखील नाही, आणि विद्यापीठ प्रशासनाकडे देखील नाही. त्यामुळे वेळीच शिक्षणव्यवस्थेला पोखरण्यापासून वाचविण्यासाठी सावध होत, योग्य पावले उचलण्याची गरज आहे. त्यासाठी काही धाडसी पावले उचलावी लागतील. त्यासाठी जागतिक विद्यापीठातील व्यवस्था अभ्यासक्रम, परीक्षापध्दती, प्रवेशपध्दती, निकालपध्दती आपल्याला समजून घेऊन, आपल्या सोयीनूसार त्यात बदल करून, राबवाव्या लागतील. तरच शिक्षणक्षेत्राला लागलेल्या या कळा थांबतील.