Breaking News

संगमनेरात वरुणराजाने केले गणरायाच्या आगमनाचे स्वागत

संगमनेर, दि. 28, ऑगस्ट - संगमनेर शहरासह तालुक्यात गणरायाची मोठ्या भक्तीभावाने स्थापना करण्यात आली. गणेशोत्सवात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये,  यासाठी प्रसासनही सज्ज झाले आहे. गणरायाच्या विसर्जन मार्गाची शुक्रवारी पोलिस व नगरपालिका प्रशासनाने पाहाणी करून अडीअडचणी लक्षात घेतल्या. तर  गणरायाच्या स्थापनेप्रसंगी वरूणराजानेही हजेरी लावल्याने भक्तांचा आनंद व्दिगुणीत झाला होता. भर पावसात ढोल, ताशांचा गजर व गणरायाच्या जयघोषाने परिसर  दुमदुमला होता.  
काही दिवसांपासून श्रींच्या आगमनाची जय्यत तयारी सुरु होती. उत्सवाच्या पूर्व संध्येला घरगुती गणेशाच्या सजावटीच्या साहित्य खरेदीसाठी शहरातील बाजारपेठेत  गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली होती. बाजारपेठ, मेनरोड, नाशिकरोड, बसस्थानक परिसर, कुंभारआळा, नविन नगररोड आदी ठिकाणी गणेशाच्या सजावटीसाठी  लागणार्‍या साहित्याची दुकाने फुलून गेली होती. सायंकाळच्या सुमारास सजावटीचे साहित्य व प्रसाद घेण्यासाठी गणेशभक्तांची मोठी गर्दी झाली होती. काल घरगुती  गणेशाची घराघरात भक्तीभावाने प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. शहरातील विविध मंडळांनी ढोलताशाच्या गजरात व गणपती बाप्पा मोरयाचा जयजयकार करत  गणरायाची प्राणप्रतिष्ठा केली. इतरांपेक्षा आपलाच देखावा आकर्षक आसावा या दृष्टीने प्रत्येक मंडळ प्रयत्न करत आहे. चालू घडामोडीवर भाष्य करणार्‍या घटना,  पौराणिक प्रसंग आणि सामाजिक संदेश  देणारे प्रबोधनात्मक तसेच नाट्यकृती करून आपला देखावा सजीव करण्यावर मंडळांचा भर आहे.  नेत्रदिपक विद्युत रोषणाई  करण्यात आल्याने परिसरात लखलखाट दिसून येत आहे.
काल श्रींच्या स्थापनेप्रसंगी वरूणराजानेही हजेरी लावल्याने भक्तांसह शेतकरी वर्गही चांगलाच सुखावला होता. भंडारदरा व निळवंडे धरण क्षेत्रात पाऊस होवून धरणे  भरलेली असतानाही लाभक्षेत्रात पावसाअभावी चिंता व्यक्त केली जात होती. खरीप हंगाम धोक्यात आला होता. मात्र गणेशोत्सव सुरू होण्याअगोदरच पावसाने हजेरी  लावल्याने शेतकर्‍यांच्या जिवातजीव आला. कालही गणरायाच्या स्वागतासाठी वरूणराजा बसरल्याने भक्त व शेतकर्‍यांचा आनंद व्दिगुणीत झाला होता. गणेशोत्सव  काळात शहर व तालुक्यात शांतता अबाधित राहण्यासाठी पोलिसांसह नगरपालिका प्रशासनही सज्ज झाले आहे. या कालावधीत नागरीकांना जास्तीत-जास्त सुविधा  देण्यावर गणेश मंडळांनीही भर दिला आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी राजस्थान युवक मंडळ व पोलीस प्रशासनाच्यावतीने प्रमुख मार्गांवर सीसीटीव्ही  कॅमेरे बसविण्यात आले आहेत. गणेशोत्सव व बकरी ईद शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाने काल शहराची पाहणी केली. प्रवरानदीकाठी विसर्जनादरम्यान सतर्कतेचे  आदेश देण्यात आले आहेत. गणेशोत्सव काळात परिस्थितीवर पोलीस यंत्रणा नियंंत्रण ठेवून आहे. शहरातील महत्वाच्या ठिकाणी पोलिसांच्या नियुक्त्या करण्यात  आल्या आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पो. नि. गोविंद ओमासे, तालुका पो.नि. गोकुळ औताडे, घारगांवचे पो.  नि. दिलीप निघोट व आश्‍वीचे पो. नि. अनिल कटके यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. एकूणच तालुक्यात गणेशोत्सव उत्साहात साजरा होत आहे.