Breaking News

रंगारी-टिळकांच्या श्रेयाचा मुद्दा आणि वाद

दि, 25, ऑगस्ट - पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळानं महापालिका आणि सरकारच्या इतिहासाच्या अभ्यासावर पˆश्‍नचिन्ह उपस्थित केले  आहे. पुणे महापालिका आणि राज्य सरकारकडून यंदा गणेशोत्सवाचं 125 वे वर्ष साजरे करण्यात येणार आहे. या पार्श्‍वभूमीवर श्रीमंत भाऊसाहेब रंगारी हे  सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक असल्याचं सांगत पालिका आणि सरकारकडून चुकीचा इतिहास मांडला जात आहे, असं मंडळानं म्हटलं आहे. याबाबतचा वाद  आता उच्च न्यायालयात गेला आहे. त्यामुळं जनक कोण, हा मुद्दा बाजूला ठेवून थोडी वस्तुस्थिती समजावून घेतली पाहिजे. 
भाऊसाहेब रंगारी यांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करायला सुरुवात केली असली, तरी या गणेशोत्सवाचं खर्‍या अर्थानं सार्वजनिकीकरण आणि त्याचा देशाच्या  स्वातंत्र्य लढ्यासाठी उपयोग केला असेल, तर तो लोकमान्य टिळकांनी, हे विसरून चालणार नाही. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी पुण्यातील गणेशोत्सवाला 1882  पासून सुरुवात केली. त्यानुसार या वर्षी गणेशोत्सवाचं 126 वे वर्ष असल्याचं या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे. गेल्या वर्षी त्यांनी शतकोत्तर रौप्यमहोत्सवी  वर्ष साजरं केलं होतं. लोकमान्य टिळकांच्याच केसरीतील अग्रलेखांचा संदर्भ देऊन या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वाड्यातला गणपती रंगारी यांनी रस्त्यावर कसा  आणला, हे निदर्शनास आणलं आहे; मात्र रंगारी यांच्यामागं कोणतंही वृत्तपत्रीय नव्हतं. टिळक यांच्याकडं  केसरी आणि मराठा यांसारखी वृत्तपत्रं होती. त्यातून त्यांनी  सार्वजनिक गणेशोत्सवाला पुरेपूर प्रसिद्धी दिली. त्यांचा केसरी थेट नेपाळपर्यंत जात होता. रंगारी व टिळक यांच्यात त्या वेळी कोणताही वाद झाला नाही. उलट,  रंगारी यांच्या मंडळांला टिळकांनी तिसरा क्रमांक दिला होता. सार्वजनिक गणेशोत्सवाचा रौप्यमहोत्सव, सुवर्णमहोत्सव, हीरक महोत्सव, अमृतमहोत्सव, शताब्दी  झाली, त्या वेळी सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक कोण हा वाद उद्भवला नाही आणि आताच कसा उद्भवला, असा प्रश्‍न केला जात आहे.
गेल्या वर्षापासून या मंडळाचे कार्यकर्ते राज्य सरकारकडं सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक भाऊसाहेब रंगारी आहेत, असं सांगून चुकीच्या इतिहासात दुरुस्ती  करण्याची मागणी करीत आहेत. त्यांना न्याय मिळाला नाही. उपोषण करूनही प्रश्‍न सुटला नाही. त्यामुळं त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. उच्च  न्यायालयानं याचिका दाखल करून घेतली. त्यावर म्हणणे मांडण्यासाठी संबंधितांना नोटिसा बजावल्या आहेत. एकीकडं ही परिस्थिती असताना मुळात खोलात  जाऊन विचार केला, की वेगळीच माहिती मिळते. पुण्याच्या गणेशोत्सवाचे वेगळे महत्त्त्व आहेच. ते कोणालाच डावलता येणार नाही; परंतु पुण्याअगोदर ग्वाल्हेरला  गणेशोत्सव साजरा होत होता. तेथील शिंदे राजघराण्याचा गणपती सार्वजनिक होता. त्याच्या दर्शनासाठी हजारो लोक येत. तिथं वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम चालत.  हे सर्व खासगीवाले यांनी पाहिलं. त्यांनी टिळकांना त्याची माहिती दिली. त्याअगोदर हिंदू मुलंही पुण्यात मोहरमसमोर नाच करायची. हे टिळकांनी पाहिलं होतं. एखादा  सार्वजनिक उत्सव साजरा करून तिथं आपल्या हिंदू मुलांना सहभागी करून घेता येईल का, याचा विचार ते करीत होते. खासगीवाले यांनी ग्वाल्हेरच्या गणेशोत्सवाची  माहिती दिल्यानंतर त्यांनी लगेच पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाला व्यापक रुप दिलं हे विसरता येणार नाही. गणेशोत्सव हे धार्मिक उत्सव असल्यानं त्यात ब्रिटिश  फार ढवळाढवळ करणार नाहीत. तिथं आलेल्या लोकांचं धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रबोधन करता येईल, स्वातंत्र्य चळवळीचं स्फुल्लिंग त्यांच्यात चेतवता येईल,  हा त्यांचा उद्देश होता. तो त्यांनी त्यातून साध्य केल्याचं दिसतं.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून सर्व समाजाला एकत्र आणण्याचं काम केलं. आजवर झालेल्या उत्सवात त्यांच्या नावाचा  उल्लेखदेखील केला जात नाही, ही दुर्दैवाची बाब आहे.  पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक लोकमान्य टिळक की भाऊसाहेब रंगारी हा वाद  मिटवण्यासाठी शासनानं समिती नेमावी, या मागणीसाठी भाऊसाहेब रंगारी मंडळाचे कार्यकर्ते चक्री उपोषणाला बसले आहेत. छत्रपती संभाजीराजे यांनी त्यांची भेट  घेऊन मुख्यमंत्र्यांकडं रद्दबदली करण्याचं मान्य केलं आहे.
शासनानंही स्वातंत्र्यसैनिक चरित्र  कोशात भाऊसाहेब रंगारी यांनी 1982 मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केल्याचं मान्य केलं आहे. मग, इतिहासात दुरुस्ती का  होत नाही, हा प्रश्‍न उरतोच. एकीकडं हे सुरू असताना पुण्यातील पहिला मानाचा गणपती असलेल्या भाऊ रंगारी गणेश मंडळाला धमकीचं पत्र आलं आहे.  तुम्हाला ठेचल्याशिवाय तुम्ही सुधारणार नाही, असा मथळा असलेलं धमकीचं पत्र पाठवून काय साध्य करता आलं, हा प्रश्‍न आहे. याबाबत दाखल याचिकेची  सुनावणी न्या. अनुप मोहता यांच्या खंडपीठापुढं झाली. रंगारी यांनी 1892मध्ये पहिला सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला व गेल्या वर्षी ट्रस्टनं 125 वे वर्ष साजरं  केलं. त्यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले व त्याला पुणे महापालिकेकडून आर्थिक मदत देण्यात आली.
पुणे महापालिकेनं पुन्हा सार्वजनिक गणेशोत्सवाचं 125वं वर्ष जाहीर करून त्यानिमित्त विविध कार्यक्रम हाती घेतले आहेत. त्याला उच्च न्यायालयात आव्हान  देण्यात आलं आहे. त्याबाबत न्यायालयानं स्पष्टीकरण मागितलं आहे. टिळक यांची खापरसून पुण्याची महापौर असताना हा वाद निर्माण व्हावा, हा योगायोग म्हणता  येणार नाही. टिळकांच्या केसरीतील अनेक माजी संपादक आणि त्याचबरोबर राज ठाकरे यांनी हा वाद निरर्थक असल्याचं म्हटलं असलं, तरी हा वाद राज्यभर  गाजतो आहे. आता न्यायालयातूनच इतिहास खरा, की खोटा? जनक कोण आणि विस्तारक कोण? यावर प्रकाश पडू शकेल.