Breaking News

अमित शाह यांनी केली भाजप खासदारांची कानउघाडणी

नवी दिल्ली, दि. 01, ऑगस्ट - राज्यसभेत काल एका विधयेकातील दुरुस्तीचा विरोधकांचा प्रस्ताव मंजूर झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी  आज भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत पक्षाच्या संसद सदस्यांची चांगलीच कानउघाडणी केली. राज्यसभेत भाजप खासदारांच्या अनुपस्थितीमुळे सोमवारी मागासवर्गीय  आयोगाला घटनात्मक दर्जा देण्याबाबतच्या विधेयकात विरोधकांनी सुचवलेल्या दुरुस्त्या मंजूर केल्या गेल्या. सत्ताधारी पक्षाच्या पराभवामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे  नाराज झाल्याचे सांगण्यात येते . या पार्श्‍वभूमीवर भाजप संसदीय पक्षाची बैठक बोलावण्यात आली होती . या बैठकीत अमित शाह यांनी पक्षाच्या खासदारांना  कानपिचक्या दिल्या. लोकसभा सदस्यांना मतदारांनी निवडले असते . त्यामुळे मतदारांच्या विश्‍वासाला त्यांनी जागले पाहिजे . राज्यसभेत पक्षाकडून पाठविल्या  जाणार्‍या मंडळींनी आपल्यावर नेतृत्वाने दाखवलेल्या विश्‍वासाला जागले पाहिजे . अनेकांना संधी नाकारून तुम्हाला पक्षाने राज्यसभेत जाण्याची संधी दिली आहे , हे  लक्षात ठेवा , असे शाह म्हणाल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले.
मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यासंदर्भातील विधेयक सोमवारी राज्यसभेत मंजूर झाले . विरोधकांनी या विधेयकात दुरुस्त्या सुचवल्या होत्या. या  दुरुस्त्यांना केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गेहलोत यांनी विरोध करताच काँग्रेस सदस्यांनी यावर मतविभाजनाची मागणी केली . मतविभाजनात विरोधकांचा  दुरुस्त्यांचा प्रस्ताव 75 वि. 54 अशा मतांनी मंजूर झाला.