Breaking News

सतत गैर हजर राहणार्‍या शिक्षकावर कारवाई करा!

बुलडाणा, दि. 29 - तालुक्यातील गोळेगाव खुर्द येथे जि.प.चे 5 वर्ग असून त्यावर दिलीप राठोड हे एकमेव शिक्षक असून ते नेहमीच शाळेवर गैरहजर राहत असल्याने शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी अनेकवेळा शिक्षक बदलून देण्याची मागणी पं.स.च्या शिक्षण विभागाकडे करूनही फायदा झाला नाही.
उलट 20 दिवसांपासून राठोड शिक्षक हे सुटीचा अर्ज देताच गैरहजर असल्याने व्यवस्थापन समिती पदाधिकार्‍यांनी व 45 पालकांनी 19 ऑगस्ट रोजी बीडीओ यांचेकडे लेखी निवेदन देऊन शिक्षकावर कारवाई व कायम स्वरुपी शिक्षक देण्यात यावा अशी मागणी केली आहे. अन्यथा 4 सप्टेंबरपासून पं.स. समोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, जानेवारी 2017 मध्ये शिक्षक दिलीप हिरालाल राठोड शाळेवर हजर राहत नसल्याने त्यांची सोनबर्डी येथील शाळेवर बदली गटशिक्षणाधिकार्यांनी केली होती. शिक्षक राठोड आमच्या शाळेवर नको म्हणून यांना 29 जुलै व 5 ऑगस्ट, 19 जुलै रोजी निवेदन देऊन सुध्दा 1 ऑगस्ट रोजी आमच्याच शाळेवर परत पाठविण्यात आले आणि केवळ 10 मिनिटे शाळेत थांबले व तेव्हापासून रजेचा कोणताही अर्ज न देताच ते आजपयर्ंत गायब आहेत. ते 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी देखील शाळेवर हजर झाले नसल्याचे तक्रार कर्त्यांनी नमूद केले आहे. उपरोक्त शिक्षकामुळे शाळेचा व शिक्षणाचा खेळखंडोबा झाला असून त्यांचेवर कारवाई करा व कायमस्वरूपी शिक्षक द्या अशी मागणी केली.
मागणी पूर्ण झाल्यास पं.स. पुढे आमरण उपोषण करण्यात येईल येईल, असा इशारा दिला असून तक्रारीवर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष धनराज घुले, उपाध्यक्ष राजू गिरी, सदस्य संजय पांडे, यांच्यासह 45 ग्रामस्थांच्या स्वाक्षर्या असून तक्रारीच्या प्रतिलिपी सर्व संबंधितांनी पाठविल्या आहेत.