Breaking News

मासेमारीवरील बंदी उठली, आजपासून मासेमारी सुरु

मुंबई, दि. 01, ऑगस्ट - गेले दोन महिने मासेमारीवर  घालण्यात आलेली बंदी उठली आहे. त्यामुळे आज मंगळवारपासून ( 1 ऑगस्ट) मासेमारी सुरु होणार आहे.  समुद्रात मासेमारीसाठी पोषक स्थिती निर्माण झाल्याने राज्यातील बंदरांमधून नौका समुद्रात जाण्यास सज्ज झाल्या आहेत. मुंबईसह कोकण किनारपट्टीवर मोठ्या  प्रमाणात मासेमारी चालते. 1 जून रोजी पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी सुरु झाला.  शासनाकडून घालण्यात आलेली ही बंदी 31 जुलै रोजी संपुष्टात आली  आहे. आतापर्यंतच्या अनुभवानुसार जोरदार पाऊस आणि वार्यामुळे समुद्राच्या पाण्याला करंट असतो. त्यामुळे मासेमारी बंदी उठल्यानंतरही मच्छीमार आपल्या नौका  समुद्रात पाठवतातच असे नाही. ते समुद्र शांत होण्याची वाट पाहतात. यामध्ये पुढील 15 दिवस तरी अपेक्षित मासेमारी होत नाही.  यावेळी मात्र पाऊस, वारा,  करंटचा धोका नसल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे गिलनेट, ट्रॉलिंग बोटींना मासेमारी करण्याची परवानगी आहे, त्या नौका पहिल्या दिवसापासूनच मासेमारी  करण्यासाठी समुद्रात जातील, अशी स्थिती आहे.