Breaking News

पुणे पालिकेत 500 कोटींचा घोटाळा, संजय काकडेंचा भाजपला घराचा आहेर

पुणे, दि. 01, ऑगस्ट - महापालिकेच्या समान पाणीपुरवठा योजनेचा प्रचंड गाजावाजा झाला. त्यासाठी महापालिकेनं कर्जरोखे उभारले. पण, या कामाच्या 1700  कोटींच्या निविदांमध्ये तब्ब्ल 500 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. त्याला भाजप खासदार संजय काकडे यांनी देखील साथ दिलीय.  त्यामुळं भाजपाला घराचा आहेर मिळाला. पुणे महापालिकेनं दोनशे कोटींचे कर्ज रोखे काढले. महापालिकेनं इतिहासात प्रथमच कर्ज रोखे काढून विकास कामांसाठी  निधी उभारला. देशातही कर्जे रोखे उभारणारी पुणे पहिली महापालिका ठरली. चोवीस तास समान पाणीपुरवठा योजनेसाठी हे कर्ज रोखे उभारले गेले. या कर्ज  रोख्यांची परतफेड पुणेकर करणार आहेत. पण,  पैसा कसा खर्च केला जात आहे.
समान पाणीपुरवठा योजनेसाठी चार टेंडर काढण्यात आली. त्याची अंदाजपत्रकीय किंमत होती,1700 कोटी. चारही टेंडर जवळपास 27 टक्के एव्हढ्या चढ्या दराची  आली. म्हणजे बावीसशे कोटींहून अधिक. चार टेंडर भरणार्‍या कंपन्या मात्र तीनच. चढे दर असूनही टेंडर मान्य करण्याच्या तयारीत प्रशासन आहे. विशेष म्हणजे या  निविदा प्रक्रियेची तक्रार सीबीआयकडे देखील गेलीय. त्यावर सीबीआयने महापालिका आयुक्तांना पत्रही लिहलं आहे.  भाजप खासदार संजय काकडे यांनी देखील या  टेंडर प्रक्रियेला आक्षेप घेतलाय. केवळ तीनच कंत्राटदारांनी आणि अधिकार्यांनी संगनमत करून 30 टक्के अधिक दराने या निविदा भरल्याची तक्रार काकडे यांनी  मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. भाजपच्या महापालिकेतील नेत्यांकडे मात्र यावर ठोस उत्तर नाही, असे चित्र आहे.
टेंडर प्रक्रियेत 500 कोटींच्या गैरव्यवहार तसंच पाण्याच्या पाईप लाईन बरोबर ओफेसी केबल टाकण्याच्या कामातील गैरव्यवहार. असे मिळून संक्रमण पाणीपुरवठा  योजनेत हजार कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप होतोय. सीबीआय पाठोपाठ आता या कथित गैरव्यवहाराची तक्रार पंतप्रधान कार्यालयाकडे करण्यात आली आहे.