Breaking News

प्रशासकीय अधिका-यांनी शासन निर्णयांची तळागाळापर्यंत अंमलबजावणी करावी - पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली, दि. 26, ऑगस्ट - भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिका-यांनी स्वत:ला नस्त्यांपर्यंतच (फाईल) मर्यादित न ठेवता शासन निर्णयांची तळागाळापर्यंत  योग्य अंमलबजावणी होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे दिले. प्रशासकीय सेवेतील अधिका-यांसोबत झालेल्या चर्चेदरम्यान  पंतप्रधान मोदी बोलत होते, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे.
पंतप्रधान मोदी यांनी केंद्र सरकारबरोबरच काम करणा-या 80 हून अधिक अवर सचिव व संयुक्त सचिवांसोबत चर्चा केली. यात अधिका-यांनी आपले कामाकडे  केवळ कर्तव्य (ड्यूटी) म्हणून न पहाता देशातील यंत्रणेत सकारात्मक बदल आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
सरकारी योजना अधिक सोप्या पद्धतीने पोचवण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करा. देशातील सर्वांत मागास 100 जिल्ह्यांवर लक्ष देऊन विकासाच्या विविध निकषांवर  त्या जिल्ह्यांना राष्ट्रीय स्तरावर आणता येईल, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.