Breaking News

जॉन्सन अँड जॉन्सनला 2672 कोटींचा दंड

वॉशिंग्टन, दि, 25, ऑगस्ट - लहान मुलांची उत्पादनं बनवणारी प्रसिद्ध कंपनी जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने महिलेला 2672 कोटी रुपये नुकसान भरपाई द्यावी,  असे आदेश अमेरिकेतील कोर्टाने दिले आहेत. पावडर वापरल्यामुळे गर्भाशयाचा कॅन्सर झाल्याचा दावा तक्रारदार महिलेने केला होता. ज्यामध्ये कोर्टात महिलेच्या  बाजूने निकाल लागला. कंपनीने कॅन्सरचा धोका असल्याचा इशारा लहान मुलांसाठी वापरल्या जाणार्‍या उत्पादनांवर दिला नसल्याचं न्यायाधीशांनी म्हटलं आहे.  याप्रकरणी एवढा दंड ठोठावण्याची ही पहिलीच वेळ आहे. आता कंपनी या निर्णयाला आव्हान देण्याच्या तयारीत आहे.
पावडर वापरल्यामुळे कॅन्सर झाला, याचे सबळ पुरावे नाहीत. त्यामुळे आम्ही कोर्टाच्या निर्णयाविरोधात दाद मागू, असं जॉन्सन अँड जॉन्सनचे प्रवक्ते कॅरोल गुडरिच  यांनी म्हटलं आहे. पावडर वापरल्यामुळे कॅन्सर झाल्याचा दावा अनेक महिलांनी जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या मुख्यालयात केला आहे. गुप्तांगाचा घाम स्वच्छ  करण्यासाठी महिला या पावडरचा वापर करत होत्या, ज्यामुळे गर्भाशयाचा कॅन्सर झाला, असं या महिलांचं म्हणणं आहे. दरम्यान यापूर्वीही कंपनीचा अशा पाचपैकी  चार प्रकरणांमध्ये कोर्टात पराभव झाला आहे. त्यामुळे जवळपास आतापर्यंत कंपनीला 20 अब्ज रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मात्र एवढा मोठा दंड  ठोठावण्याची ही पहिलीच वेळ आहे.