Breaking News

200 रुपयांची नोट तूर्तास एटीएममध्येे मिळणार नाही

नवी दिल्ली, दि, 25, ऑगस्ट - गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर देशात आजपासून 200 रुपयांची नोट चलनात येणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात आरबीआयने ही  माहिती दिली आहे. केंद्र सरकारने दोनशे रुपयांची नोट बाजारात आणण्याची अधिसूचना नुकतीच जारी केली होती. 200 रुपयांच्या सुमारे 50 कोटी नोटा बाजारात  आणण्यात येणार आहेत. दरम्यान दोनशेच्या नोटेवर गव्हर्नर उर्जित पटेल यांची सही आहे. या नोटांची मोठ्या प्रमाणात छपाई सुरु आहे. बाजारात आल्यानंतर या  नोटेचा तुटवडा जाणवू नये म्हणून खबरदारी घेण्यात येत आहे.
100 आणि 500 रुपयांमधील एखादी नोट चलनात आणण्याची ही देशातील पहिलीच वेळ आहे. 100 रुपयानंतर थेट 500 आणि त्यानंतर थेट दोन हजाराची  नोट, यामुळे या चलनात मोठी तफावत जाणवत असे. त्यामुळे दोनशे रुपयांची नोट आणली जात असल्याचं सांगण्यात येत आहे. 200 रुपयांच्या नव्या नोट  आरबीआयच्या निवडक कार्यालयांमध्ये आणि काही बँकांमध्येच उपलब्ध असतील. सध्या या नोटा एटीएममध्ये मिळणार नाही, कारण नव्या नोटांसाठी एटीएम  रिकॅलिबरेशन करण्याची आवश्यकता आहे. नऊ महिन्यात चलनात येणारी ही दुसरी नवी नोट असेल. यापूर्वी नोटाबंदीनंतर 8 नोव्हेंबर 2016 रोजी दोन हजाराची  नोट आणण्याची घोषणा सरकारने केली होती. त्यानंतर आज दोनशे रुपयांची नोट बाजारात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं.