Breaking News

‘मुंबईतील मराठा महामोर्चात 25 लाख आंदोलकांचा सहभाग’

मुंबई, दि. 08, ऑगस्ट - आरक्षण आणि विविध मागण्यांसाठी राज्यभरात सुरु असलेला मराठा महामोर्चा बुधवारी मुंबईत असणार आहे. महामोर्चाची तयारी पूर्ण  झाली असून यामध्ये 25 लाखाहून अधिक आंदोलक असतील असा दावा मुंबई समन्वय समितीतर्फे करण्या आला आहे.
यासंबधीच्या नियोजनाबाबत मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती देण्यात आली. आतापर्यंत झालेल्या 57 मूक मोर्चांप्रमाणेच या  58व्या मोर्चाची आचारसंहिता असेल असेही सांगण्यात आले.  मूक स्वरूपाचा हा ऐतिहासिक महामोर्चा ठरेल असे समितीचे समन्वयक वीरेंद्र पवार यांनी सांगितले.
सकाळी 11 वाजता वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानापासून मराठा मोर्चाला सुरुवात होईल. दरम्यान, कोणत्याही प्रकारची भाषणे आणि घोषणा या वेळी दिल्या  जाणार नाहीत. राणीबागहून निघालेला मोर्चा कै. अण्णासाहेब पाटील पूल, खडापारसी, इस्माईल मर्चंट चौक, जे. जे. उड्डाणपूलमार्गे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस  ओलांडून आझाद मैदानात विसर्जित होईल.