Breaking News

विदर्भ : वीज कोसळून 2 ठार 13 जखमी; यवतमाळ व नागपुरातील घटना

नागपूर, दि. 28, ऑगस्ट - विदर्भात रविवारी 27 ऑगस्ट रोजी वीज कोसळून यवतमाळ येथे दोन महिलांचा मृत्यू झाला तर नागपूर जिल्ह्यात 13 जण जखमी  झालेत. या संदर्भातील अधिकृत माहितीनुसार मुसळधार पावसापासून बचाव करण्यासाठी शेतातील झाडाखाली थांबलेल्या झाडावरच वीज कोसळल्याने दोन महिला  ठार झाल्या. ही घटना यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील कायर येथे 27 ऑगस्ट रोजी संध्याकाळी घडली. सरिता पंकज कुंटावार (वय 25) व अनसुया  चौधरी (वय 35) अशी मृत महिलांची नावे आहेत.
घटनेच्या वेळी या दोन्हीं महिला कुंटावार यांच्या शेतात काम करीत होत्या. दरम्यान, संध्याकाळी वारा व मुसळधार पाऊस सुरू होताच इतर शेतमजूर घरी निघून  गेले. मात्र, सरिता आणि अनसुया या दोघीही शेतात झाडाखालीच थांबल्या. दरम्यान, त्याच झाडावर वीज कोसळल्याने यात सरिता आणि अनसुया या दोघीही  जागीच ठार झाल्या. दरम्यान नागपूर जिल्ह्यातील उमरेड आणि बेला येथेही विजांचे तांडव झाले.
बेला नजीकच्या खुर्सापार शिवारातील एका शेतात निंदण्याचे काम करीत असताना वीज पडून शेतात काम करणार्‍या 12 महिला जखमी झाल्या. बेला गावात दुपारी  अडीच वाजताच्या सुमारास काही महिला मजूर शेतात निंदणाचे काम करित होत्या. यावेळी अचानक पावसाला सुरुवात झाल्याने सर्व मजूर शेतातील झोपडीत गेले.  दरम्यान, झोपडीच्या बाजुला असलेल्या झाडावर अचानक वीज कोसळली. यात 12 महिला जखमी झाल्यात
यामध्ये सुशीला श्रवण हागे , रंजना विनोद हागे , उषा हरिचंद्र कामडी , रुपाली पंकज मेश्राम , शेवंता नामदेव शेंडे , राईबाई नामदेव शेंडे , मालताबाई डोमाजी  तेलरांधे , तुळजा बाबाराव भुसारी, अलका बाबाराव भुसारी , सुषमा रामभाऊ हागे , हरीश महादेव हिंगे यांचा समावेश आहे. त्यांना तातडीने बेला येथील प्राथमीक  रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमीक उपचारानंतर सर्वांना सुटी देण्यात आली. दरम्यान उमरेड तालुक्यातील कटारा शिवारात शेतावर गेलेला 32 वर्षीय  युवक वीज पडून गंभीर जखमी झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, मकरधोकडा येथील युवराज अशोक राऊत हा तरूण दीपक भोयर यांच्याकडे मजुरी करतो. रोजच्याप्रमाणे तो आईसोबत शेतावर गेला  होता. दुपारी अचानक विजांच्या कडकडाटांसह जोरदार पावसाला सुरुवात झाली. युवराज आईसोबत पाण्यापासून बचावाकरिता उभ्या असलेल्या ठिकाणी वीज  पडल्याने त्याचा कंबरेपासूनचा भाग निकामी झाला. आईने आरडाओरड केली असता शेजारील शेतकरी धावत आले. त्यांनी तात्काळ त्याला स्थानिक प्राथमिक  आरोग्य केंद्रात नेले असता डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून नागपूरला हलविण्याच्या सूचना केल्या. त्याला नागपूर येथील नेरकर हॉस्पिटलमध्ये दाखल केले.  त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.