Breaking News

देशातील विद्यापीठांना राजकारणांची कीड - डॉ. जयंत नारळीकर

पुणे, दि. 01 - देशातील एकही विद्यापीठ राजकारणापासून मुक्त नाही. या राजकारणाने विद्यापीठाचे क्षेत्र ओलांडून आता देशातील राष्ट्रीय संशोधन क्षेत्रामध्ये प्रवेश  केला आहे, ही धोक्याची घंटा आहे. राष्ट्रीय संशोधन संस्था शासकीय अधिकारशाही आणि लालफितीच्या कारभारात अडकल्या आहेत, असे परखड मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ  डॉ. जयंत नारळीकर यांनी आज येथे व्यक्त केले. 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 111 वा पदवी प्रदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. नारळीकर बोलत होते. यावेळी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, कुलसचिव  डॉ. अरविंद शाळिग्राम, परीक्षा मंडळाचे संचालक डॉ. अशोक चव्हाण उपस्थित होते. यावेळी डॉ. नारळीकर यांच्या हस्ते तंत्रज्ञान शाखेत एमटेक करणार्‍या धवल  खाचणे, संदीप मालवीय, कविता त्रिमल, संयुजा वायचळ तसेच पीएचडी करणार्‍या अपूर्वा देशमुख यांना सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले. मीडिया कम्युनिकेशन  विभागातील विद्यार्थी प्रांतिक देशमुख याने दिग्दर्शित केलेल्या मातीतली कुस्ती’ या शॉर्ट फिल्मला नॅशनल फिल्मफेअर वॉर्ड मिळाल्यानिमित्त त्याचाही सत्कार करण्यात  आला. या पदवी प्रदान समारंभात एकूण सात हजार 130 विद्यार्थ्यांना पदवी आणि पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच, 164 विद्यार्थ्यांना पीएचडी  प्रमाणपत्रांचे वितरित करण्यात आले.
डॉ. नारळीकर म्हणाले, शिक्षणासाठी सतत झटणारे आणि विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यात आनंद वाटणारे विद्वान बोटावर मोजण्याएवढे राहिले आहेत. उत्कृष्टतेची कदर  करणारे आणि धन-सन्मानांबद्दल निस्पृह असणे, असे गुण असणारे विद्वान किती सापडतील, याबाबत शंका आहे. ही परिस्थिती असतानाच देशातील एकही  राजकारणापासून मुक्त नाही. या राजकारणाने आता देशातील संशोधन क्षेत्रामध्ये प्रवेश केला आहे, ही चितेंची बाब आहे.
केंब्रिज विद्यापीठ गेल्या 800 वर्षांपासून आपले अग्रस्थान टिकवून आहे. कारण या विद्यापीठातील प्रवेशाचे निकष अवघड आहेत. अधिक गुणवत्ता असल्याशिवाय इथे  प्रवेश मिळत नाही. लोकशाहीत सर्वांना सारखी संधी द्यावी; पण विशेष गुणवत्ता असलेल्यांना अधिक शिकायची विशेष सोय उपलब्ध झाली पाहिजे. तसे झाले नाही  तर आपल्याकडचे विद्वान पूज्य म्हणजे पूजनीय नसून दुसर्‍या अर्थाने पूजनीय ठरतील, असेही डॉ. नारळीकर यांनी नमूद केले. कुलगुरू डॉ. करमळकर यांनी  विद्यापीठाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. डॉ. शाळिग्राम यांनी प्रास्ताविक केले. आनंद देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.