Breaking News

विविध लोकगीतातून रसिकांना महाराष्ट्राच्या वैभवशाली संस्कृतीचे दर्शन

पुणे, दि. 01 - ’उजळुन आलं आभाळ वासुदेवाची स्वारी आली’,’रात्र काळी घागर काळी’,’जोहार मायबाप जोहार’ अशा गण,गौळण, अभंग,  पोवाडा,भारूड,लावणी, नाट्यगीत या विविध लोकगीतातून रसिकांना महाराष्ट्राच्या वैभवशाली संस्कृतीचे दर्शन झाले. 
निमित्त होते येथील भारतीय विद्याभवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनतर्फे सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमाअंतर्गत आयोजित संस्कृती महराष्ट्राची वैभवशाली परंपराया  वैशिष्टपूर्ण कार्यक्रमाचे.
सांस्कृतिक कला अकादमी प्रस्तुत हा कार्यक्रम धनश्री कुलकर्णी, चंद्रकांत निगडे आणि नीता गुरव या कलाकारांनी सादर केला. त्यांना दिलीप व्यास, विजय पवार,  राजेंद्र साळुंखे आणि रशीद या वादक कलाकारांनी साथसंगत केली. यावेळी भारतीय विद्याभवनचे संचालक आणि मानद सचिव प्रा. नंदकुमार कार्किडे उपस्थित होते.
’जय जय महाराष्ट्र माझा’ या महाराष्ट्रगीताने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. ’उजळुन आलं आभाळ वासुदेवाची स्वारी आली, गाव जगावत आली वासुदेवाची स्वारी आली’  या गीतातून रसिक श्रोत्यांसमोर कलावंतानी शिवजी महाराजांचा कालखंड उभा केला. त्यानंतर आपल्या शेती संस्कृतीवर भाष्य करणारे ’जीवा शिवाची बैल जोडी’ हे  बळीराजाच्या संस्कृतीचे यर्थाथ जीवन रेखाटणारे गाणे सादर केले गेले. शेती बरोबरच आपली आदीवासी संस्कृती पूरातन असून त्यातील चालीरिती देखील समृद्ध  आहेत. निसर्गाशी एकरुप होऊन मानव आणि निर्सग हातात हात घालून कसे जगू शकतात याचे वर्णन असलेले ’लिंगोबाचा डोंगर आभाळी’ हे गीत सादर करण्यात  आले. त्यानंतर ’एकवीरा आई तू डोंगरावरी’, ’जोहार मायबाप जोहार’ या’ गीतांनी उपस्थित रसिकांच्या काळजाचा ठाव घेतला. ’रात्र काळी घागर काळी’, ’अरे  कृष्णा अरे कान्हा’, ’सोळाव वरिस धोक्याचं’, ’वद जाऊ कुणाला शरण’ अशा विविध प्रकारच्या लोकगीतांच्या सादरीकरणातून कार्यक्रमाची रंगत वाढतच गेली.