Breaking News

शहर, उपनगरात चोरट्यांचा धुमाकूळ

अहमदनगर, दि. 01 - शहरातील सावेडी, सारसनगर आणि  वाकोडी फाटा या उपनगरात चोरट्यांनी बुधवारी रात्री धुमाकूळ घातला. तीन घरे आणि दोन मंदिरे फोडून लाखो रुपयांचा माल चोरुन नेला आहे. यातुन नागरीकांमंध्ये एक दशहत निर्माण झाली असून यावर पोलिसांनी आपली गस्त वाढवावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आली आहे.
सावेडीतील नंदनवन कॉलनीतील गौरव रविकांत घोडके यांच्या बंगल्याच्या स्टोअर रुममधील खिडकीचे गज कापून चोरट्यांनी आत प्रवेश केला. सोन्याचे दागिने आणि रोख रक्कमेसह 1 लाख 23 हजार रुपयांचा ऐवज चोरला. घोडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक पठाण पुढील तपास करीत आहेत.
सावेडीतील वसंत टेकडी भागामधील बहार अर्बन बँक कॉलनीत दुसरी घरफोडी झाली. अर्जुन यादवराव आंधळे यांचा बंगला चोरट्यांनी बुधवारी रात्री पावणे दोन ते साडे पाच वाजण्याच्या दरम्यान फोडला. गणपतीची मूर्ती व घंटी असा 9 हजार रुपयांचा ऐवज चोरला.
सारसनगर भागातील मंदिरे चोरट्यांनी फोडली. या भागातील चार मंदिरे फोडण्याचा प्रयत्न केला. दोन मंदिरे फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. सोमेश्‍वर महादेव मंदिर आणि कपिलेश्‍वर कॉलनीतील रेणुकामाता मंदिराचा दरवाजा तोडून दानपेटेतील रक्कम, चांदीचे बेलपान असा सुमारे 12 हजार रुपयांचा ऐवज चोरला. इवळेमळा भागातील दत्त मंदिर आणि भगवानबाबा चौकातील भगवानबाबा मंदीर फोडण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी दरवाजा दणकट असल्याने फुटला नाही. नगर-सोलापूर महामार्गावरील वाकोडी फाटा (ता. नगर) येथील अरूशी टॉवर्समधील सचिन गणपत हरिश्‍चंद्रे यांचा फ्लॅटचा दरवाजा तोडून चोरट्यांनी 70 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरले. हरिश्‍चंद्रे यांनी दिलेल्या भिंगार पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.