Breaking News

खा.सुळे यांच्यामुळे महिला बचत गट चळवळीला गती : घुले

अहमदनगर, दि. 01 - महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना आत्मविश्‍वास देणार्या बचत गट चळवळीला खा.सुप्रियाताई सुळे यांच्या प्रयत्नातून मोठी गती मिळाली, असे प्रतिपादन जि.प.उपाध्यक्षा राजश्रीताई घुले यांनी केले. खा.सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त नगर जिल्हा रूग्णालयात रूग्णांना फळे वाटण्यात आली व त्यांना चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमावेळी उपाध्यक्षा घुले बोलत होत्या. याप्रसंगी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्ष रेश्माताई आठरे, महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस शारदा लगड, निर्मला मालपाणी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पांडुरंग वरूटे,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बापूसाहेब नागरगोजे आदी उपस्थित होते.
उपाध्यक्षा सौ.घुले पुढे म्हणाल्या की, महाराष्ट्रात बचत गटाची चळवळ शिखरावर नेण्यात खा.सुळे यांचा सिंहाचा वाटा आहे. भिमथडी सारख्या उपक्रमातून त्यांनी बचत गटांच्या उत्पादनांना हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले. त्यामुळेच ग्रामीण भागातील महिला सक्षमपणे स्वकर्तृत्वावर उभ्या असलेल्या दिसतात. राज्यातील महिला वर्ग मोठ्या आशेने त्यांच्याकडे पाहत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून महिलांच्या न्याय हक्कासाठी त्या सातत्याने लढा देत आहेत. त्यांचे कार्य सर्व महिलांसाठी  प्रेरणादायी असल्याचे घुले यांनी सांगितले.
ऍड.शारदा लगड म्हणाल्या की, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महिला सक्षमीकरणासाठी त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50 टक्के आरक्षण दिले. त्यामुळे महिला घराबाहेर पडून चांगल्या प्रकारे सामाजिक कार्य करू लागल्या. त्यांचाच वारसा खा.सुळे समर्थपणे पुढे चालवून महिलांच्या उन्नतीकरिता भरीव योगदान देत आहेत.
प्रारंभी रेश्मा आठरे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास अपर्णा पालवे, ज्योती निकम, राजश्री मांढरे, लता गायकवाड, वैशाली गुंड, सुरेखा कडूस, शिल्पा बालवे, रेखा भोईटे, लतिका पवार आदींसह महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या उपस्थित होत्या.