Breaking News

सरकारच्या तातडीच्या मदतीचा 90 लाखापैकी 3 हजार शेतकर्‍यांना लाभ

मुंबई, दि. 24, जुलै - मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर शेतकर्‍यांसाठी तत्काळ मदत म्हणून 10 हजार रुपयांची आगाऊ  मदत जाहीर केली.  या मदतीचा फायदा राज्यातील 90 लाखांपेक्षा जास्त शेतकर्‍यांना मिळणे अपेक्षित होते. मात्र केवळ 3200 शेतकर्‍यांनाच ही तातडीची मदत  मिळाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष आणि शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी याबाबतची  माहिती उघड केली आहे.
महाराष्ट्रातील 90 टक्के शेतकरी पेरणीचा खर्च करण्यासाठी अल्पकालीन पीककर्ज घेतात. त्यात मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा होऊनही बँकांकडूनही नवीन  पतपुरवठा होऊ शकत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांच्या हितासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रत्येकी 10 हजारांची तातडीची मदत 14 जूनला जाहीर केली. यावेळी राज्य सरकारने  बँकांना आपली हमी तत्काळ जारी केली होती. पण तातडीच्या मदत वाटपाचा आदेश बँकांनी 15 जुलैपर्यंत संबंधित शाखांना दिले नसल्याचा आरोप तिवारी यांनी  केला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांवर उद्भवलेल्या या परिस्थितीला जबाबदार असलेल्या सर्व उच्चस्तरीय अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वसंतराव   तिवारी यांनी केली आहे.