Breaking News

गरजवंत शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळणारच : श्‍वेता महाले

चिखली,(प्रतिनिधी), दि. 25 - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बळीराजाप्रती आस्था असलेले नेतृत्व आहे.  बोले तैसा चाले  असे राज्य सरकारचे धोरण आहे. आतापर्यंत कधीच मिळाली नव्हती अशी अभूतपूर्व कर्जमाफी जाहीर करणारे हे सरकार दिलेल्या शब्दाला जागणारे आहे. त्यामुळे विरोधकांनी चालवलेल्या अपप्रचाराला शेतकरी बांधवांनी अजिबात बळी पडू नये. कर्जमाफीसाठीचे अर्ज जिल्हा सहकारी बँक अथवा राष्ट्रीयकृत बँक या पैकी संबंधीत बँकेकडे त्वरीत सादर करुन या ऐतीहासीक कर्जमाफीचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्या तथा जिल्हा परिषद सभापती श्‍वेताताई महाले यांनी केले आहे. काही तांत्रिक बाबींची पूर्तता करण्याच्या कामी राज्य सरकार युध्द पातळीवर लागले असून जाहीर झालेल्या कर्जमाफीचा लाभ जिल्ह्यातील प्रत्येक गरजवंत असलेल्या शेतकरी बांधवाला मिळेल असा विश्‍वास श्‍वेताताई महाले यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे व्यक्त केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेद्वारे राज्य सरकारने राज्यातील शेतकर्‍यांना ऐतीहासिक कर्जमाफी जाहीर केली. या क्रांतीकारी निर्णयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, कृषी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर, अर्थमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार, सहकार मंत्री ना. सुभाषबापू देशमुख यांना श्‍वेताताई महाले यांनी धन्यवाद दिले आहेत. मागील सरकारने दिलेल्या कर्जमाफीच्या तुलनेत विद्यमान सरकारची कर्जमाफी कितीतरी व्यापक, सर्वस्पर्शी आणि न्यायपूर्ण असल्याचा दावा श्रीमती महाले यांनी केला आहे. काँग्रेस आघाडीच्या राज्य सरकारने 8 वर्षांपूर्वी जाहीर केलेल्या कर्जमाफीमध्ये बुलडाणा जिल्ह्याचा वाटा केवळ 3 कोटी 88 लाख रुपये एवढा होता. परंतु, भाजपा सरकारच्या कर्जमाफीमधून जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे किमान एक हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ होणार असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. आधीच्या सरकारने कर्जमाफी देतांना पाच एकर शेतीची अट घातली होती. मात्र या सरकारने सरसकट कर्जमाफी घोषित केली आहे. युपीए सरकारच्या कर्जमाफीचा मलिदा बँकांनी लाटल्याची आठवण करुन देत त्यांनी भाजपा सरकार कर्जमाफीची रक्कम थेट शेतकरी बांधवाच्या खात्यात जमा करणार असल्याचे सांगीतले. पूर्वीच्या सरकारने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर 12 महिन्यांनी त्याची अंमलबजावणी झाली याकडे श्‍वेताताईंनी आपल्या पत्रकातून लक्ष वेधले. घोषीत झालेल्या कर्जमाफी नूसार प्रत्येक गरजू शेतकरी बांधवाचे कर्ज निश्‍चित माफ होईल या बाबत आपल्या मनात कसलीही शंका नसल्याची स्पष्टोक्ती श्‍वेताताई महाले यांनी केली आहे.
हा तर हताश विरोधकांचा कांगावा
राज्य शासनाने जाहीर केलेल्या सरसकट कर्जमाफीची तंतोतंत अंमलबजावणी करण्यावर सरकारचा कटाक्ष असून त्यासाठी अनिवार्य असलेल्या तांत्रिक बाबींची पूर्तता युध्द पातळीवर सुरु असून ते लवकरच पूर्ण होऊन शेतकर्‍यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होईल अशी माहिती श्‍वेताताई महाले यांनी आपल्या पत्रकाद्वारे दिली आहे. आधीच्या सरकारला कर्जमाफीच्या घोषणेनंतर एक वर्ष देणार्‍या बळीराजाने दोन महिन्यातच आपला धीर सोडू नये अशी विनंती देखील श्रीमती महाले यांनी केली आहे. महत्वाची बाब म्हणजे या कर्जमाफीचा फायदा थकीत कर्जदार, नियमीत कर्ज भरणारे आणि कर्जाचे पुनर्गठण करु इच्छीणार्‍या अशा सर्व प्रकारच्या गरजू शेतकरी बांधवांना मिळणार असल्याचे त्या म्हणाल्या.  ज्यांनी 2008 मध्ये जाहीर केलेली तुटपूंजी कर्जमाफी देण्यासाठी 12 महिने शेतकर्‍याला वाट पहायला लावली तेच लोक अवघ्या दोन महिन्यात माझी कर्जमाफी झाली नाही, अशी कोल्हेकुई करीत शेतकर्‍यांच्या डोळ्यात धूळ फेकत असल्याचा टोमणा श्‍वेताताईंनी विरोधकांना लगावला.
सत्ता आणि जनाधार दोन्हीही गमावलेल्या विरोधी पक्षांनी राजकीय नैराश्य आणि हताशेच्या आहारी जाऊन राज्य सरकारची बदनामी चालवल्याचा आरोप श्‍वेताताई महाले यांनी केला असून या कांगाव्याला शेतकरी बांधवांनी बळी पडू नये, तर प्रत्येक शेतकर्‍याने आपल्या कर्जमाफीचा अर्ज संबंधीत बँकेला सादर करावा, असे आवाहन त्यांनी या पत्रकातून केले आहे.