Breaking News

वसंतदादा शेतकरी साखर कारखान्याच्या कामगारांना 15 टक्के पगारवाढ

सांगली, दि. 02 - वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना कामगार युन्री दत्त इंडिया कंपनी (मुंबई) यांच्यात महत्त्वपूर्ण करार झाला. त्यात या साखर  कारखान्याकडील 600 कर्मचारी श्री दत्त इंडिया कंपनीकडे, तर उर्वरित 134 कर्मचारी साखर कारखाना व्यवस्थापनाकडे राहणार आहेत. या सर्वच कामगारांना 15  टक्के पगारवाढ देण्यात येणार आहे. साखर कारखाना कामगारांची एकूण थकित रकमेपैकी पहिल्या टप्प्यात 30 टक्के रक्कम तात्काळ दिली जाणार असून उर्वरित 70  टक्के रक्कम सव्वा पाच वर्षात पाच टप्प्यात देण्यात येणार आहे.
श्री दत्त इंडिया कंपनीचे मुख्य अधिकारी एस. एस. धारू, सरव्यवस्थापक मृत्यूंजय शिंदे, सचिव सचिन मोरे, साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, महाराष्ट्र  राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे कार्याध्यक्ष रावसाहेब पाटील, खजिनदार रावसाहेब भोसले, वसंतदादा पाटील शेतकरी साखर कारखाना कामगार युनियनचे  अध्यक्ष विलास पाटील, उपाध्यक्ष अशोक साळुंखे, कार्याध्यक्ष शिवाजी पाटील, सरचिटणीस प्रदीप शिंदे, सर्जेराव भोसले, चंद्रकांत सावंत, दिलीप गोरे, पोपट पाटील,  रामचंद्र पाटील, चंद्रकांत पाटील, राजू सय्यद व अरूण संकपाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात साखर कारखाना  कामगार युनियन व श्री दत्त इंडिया कंपनी यांच्यात हा सामंजस्य करार झाला.
वसंतदादा पाटील शेतकरी साखर कारखाना श्री दत्त इंडिया कंपनीने दहा वर्षे भाडेकराराने चालविण्यास घेतला आहे. तत्पूर्वी साखर कारखाना कामगार यांच्यासमवेत  या कंपनीने करार केला. हा करार दहा वर्षासाठी असणार आहे. दर चार वर्षांनी कामगारांना पगारवाढ देण्यात येणार आहे. याशिवाय सुरूवातीस साखर  कारखान्याकडील 734 कामगारांना 15 टक्के पगारवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक कामगाराच्या पगारात दरमहा 2400 ते 2700 रूपये इतकी वाढ होणार  आहे. मात्र ही रक्कम गळीत हंगाम यशस्वीपणे पार पडल्यानंतर एकरकमी दिली जाणार आहे. दि. 1 एप्रिल 2018 पासून पगारवाढीची ही रक्कम दरमहा मिळणार आहे.
साखर कारखाना कामगारांच्या थकित देयकाबाबतही या बैठकीत चर्चा झाली. त्यात ठरल्यानुसार कामगारांना सव्वा पाच वर्षात दोन ते तीन लाख रूपये मिळणार  आहेत. थकित पगारातील 30 टक्के रकमेचे सुमारे 60 ते 70 हजार रूपये तातडीने दिले जाणार आहेत. मात्र वयोमानानुसार जे कामगार निवृत्त होणार आहेत, त्यांना  फंडासह पाच ते आठ लाख रूपयांची रक्कम अदा केली जाणार आहे. प्रॉव्हिडंट फंडाची रक्कमही श्री दत्त इंडिया कंपनीकडून मार्च 2018 अखेर भरली जाणार असून  सेवानिवृत्त कामगारांची देणीही टप्प्या- टप्प्याने देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. हा करार ऐतिहासिक असून या करारामुळे साखर कारखाना कामगारांनी  आनंद व्यक्त केल्याचे प्रदीप शिंदे यांनी सांगितले.