Breaking News

आनंदऋषीजी हॉस्पिटलची सेवा माफक व दर्जेदार

अहमदनगर, दि. 27 - वैद्यकीय उपचार दिवसेंदिवस सामान्य जनतेच्या आवाक्याच्या बाहेर जात असताना आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये अत्यंत माफक दरात दर्जेदार योग्य उपचार होत असल्याने हॉस्पिटलमधून बरे झालेले रुग्ण गुरुदेव आनंदऋषीजी महाराजांचे नाव घेत आनंदाने व समाधाने घरी जात आहेत. नगरमधील रुग्णांचे या हॉस्पिटलमुळे पुणा-मुंबईला उपचारासाठी जाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. असे प्रतिपादन खा.दिलीप गांधी यांनी केले.
आचार्य श्री आनंदऋषीजी म.सा. यांच्या 116 व्या जन्मजयंती दिनानिमित्ताने आनंदऋषीजी हॉस्पिटल व लायन्स क्लब ऑफ सेवा यात्री यांच्यावतीने तसेच स्व.जतनबाई माणकचंद बोथरा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पारस उद्योग समुहाच्या सहकार्याने आयोजित किडनी आजार व डायलेसिस उपचार शिबीराचे उद्घाटन खा.दिलीप गांधी यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने झाले. यावेळी माणकचंद बोथरा, डायलेसिस विभागप्रमुख प्रकाश मुनोत, संपत बाफना, पेमराज बोथरा, संतोष बोथरा, सतीश बोथरा, मर्चंट बँकेचे संचालक आनंदराम मुनोत, अर्बन बँक संचालक नवनीत सुरपुरिया, किशोर बोरा, डॉ.प्रकाश कांकरिया,उद्योगपती अशोक पारख, सौ.प्रतिभा बोथरा, सौ.संगीता बोथरा, सौ.मनिषा बोथरा, माणकचंद कटारिया, निखिलेंद्र लोढा, सतीश लोढा, सुभाष मुनोत, डॉ.आशिष भंडारी आदि मान्यवर उपस्थित होते. या शिबीरात न्युरो सर्जन डॉ.आनंद काशिद, किडनी विकार तज्ञ डॉ.भुपेंद्र कवारे, डॉ.निरज गांधी आदिंनी रुग्णांची तपासणी करुन उपचार केले.खा.गांधी पुढे म्हणाले, जैन समाजाच्या माध्यमातून आनंदऋषीजी हॉस्पिटल चालविले जात आहे. आनंदऋषीजी महाराजांच्या सेवा, मदत व समाजकार्य करण्याच्या शिकवणीनुसार जैन समाज काम करत असल्याने जैन समाजाबद्दल सर्वत्र आदर निर्माण झाला आहे. त्या भावनेनेच आज या हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णसेवा होत आहे. देश पातळीवर हॉस्पिटलचे नाव गेल्याने पर जिल्ह्यातील व परराज्यातील रुग्ण येथे येवून हृदयशस्त्रक्रिया करुन घेत आहेत. आनंदऋषीजी महाराज हे केवळ जैन समाजाचे गुरु नव्हते तर सर्व धर्माचे गुरु होते. त्यामुळे त्यांच्या आशिर्वादाने या हॉस्पिटलमधून रुग्ण आनंदाने व समाधानाने बरे होत आहेत. हॉस्पिटलसाठी योगदान देणार्‍या सर्व स्वयंसेवकांचे अभिनंदन.
यावेळी बोलताना संतोष बोथरा म्हणाले, किडनी विकार व डायलेसिसच्या उपचाराचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. अत्याधुनिक यंत्रसामुग्रीमुळे चांगले उपचार मिळत असल्याने नगर जिल्ह्याबरोबरच आजुबाजूच्या जिल्ह्यातूनही रुग्ण उपचारासाठी येथे येत आहेत. खासदार दिलीप गांधी यांचे मोलाचे योगदान हॉस्पिटलच्या जडण-घडणीमध्ये आहे. हॉस्पिटलच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी ते कायम तत्पर असतात. तसेच उद्योजक प्रकाश मुनोत यांचेही डायलेसिस विभागास सहकार्य लाभते.
कार्यक्रमाच्या प्रास्तविकात डॉ. प्रकाश कांकरिया यांनी सांगितले की, डायलेसिस विभाग अहोरात्र कार्यान्वित आहे. पहाटे 5 पासून रात्री 2 वाजेपर्यंत शेकडो रुग्ण दररोज या ठिकाणाहून उपचार घेत आहेत. या पुढील काळात किडनी विकाराच्या रुग्णांना अधिक चांगला सुविधा मिळाव्यात तसेच किडनी रोपनाचेही या ठिकाणी लवकरच सुरु करणार आहोत, असे सांगून सर्वांचे स्वागत केले या शिबीरात एकूण 144 रुग्णांची तपासणी करण्यात आली. आभार प्रकाश छल्लानी यांनी मानले. शुक्रवार दि.26 ऑगस्ट रोजी दंत तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन स.10 ते 2 या वेळेत करण्यात आले आहे. याचा रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन हॉस्पिटलच्यावतीने करण्यात आले.