जांबुत बुद्रुक, खैरदरा, मोरेवाडीत छापे, 10 लाखाची 250 ब्रास वाळु जप्त
प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी आंबेकर यांच्या कारवाईने वाळू तस्करांचे धाबे दणाणले
संगमनेर, दि. 24 (प्रतिनिधी) :- संगमनेर शहरासह तालुक्यातून मुळा, प्रवरा व म्हळुंगी नदीपात्रातून बेसुमार बेकायदा, विनापरवाना वाळु उपसा सुरू आहे. हि वाळू साठाकरून ठेवण्यात येत असल्याची माहिती महसुल विभागाला मिळत आहे. त्यानुसार प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी प्रियंका आंबेकर यांनी वाळु तस्करांना लगाम घालण्यासाठी जिवाची पर्वा न करता धडक मोहिम हाती घेतली आहे. याचाच एक भाग म्हणून शनिवारी दुपारी तालुक्यातील पठारभागातील जांबुत बुद्रुक, खैरदरा व मोरेवाडी या ठिकाणी छापे मारून जवळपास 10 लाख रुपये किंमतीची 250 ब्रास वाळु जप्त केली. वाळुसाठी करणारांची माहिती घेण्यात येत असून गुन्हे दाखल होणार असल्याने वाळु साठा करणारे व तस्करी करणार्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.संगमनेर तालुक्यात फोफावणारी वाळु तस्करी तशी नवी नाही. महसुल व पोलिस प्रशासनाच्या तुटपूंजी व आर्थिक व्यवहारातून होणार्या कारवाईमुळे वाळु तस्करांचे चांगलेच फावते आहे. कमी वेळात व कुठलीही आर्थिक गुंतवणूक नसलेल्या या व्यवसायात पक्षीय कार्यकर्ते व तरूणांचा मोठा सहभाग आहे. यावर अनेक सामाजिक कार्यकर्ते व नागरीकांनी आवाज उठविण्याचा प्रयत्न केला, मात्र वाळु तस्करांच्या वाढत्या दादागिरीफमुळे व प्रशासनाच्या लागेबांध्यामुळे त्यांना प्रोत्साहन मिळत आहे. त्यांच्या दादागिरीमुळे महसुलच्या अधिकारी व कर्मचार्यांना मारही खावा लागला आहे. माहिती देणार्या नागरीकांना वाळु तस्करांच्या रोषाला सामोरे जावे लागते. एकंदरीतच वाळु माफीयांचे परसलेले जाळे व होणारी देवाण-घेवाण रोखण्यासाठी प्रधासनाला कठोर पावले उचलावे लागणार आहे.
दरम्यान जिल्ह्यात महसुल व पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचार्यांच्या बदल्यामुळे बरेच फेर बदल झाले आहे. नव्याने रूजू झालेला स्टाफ जोमात काम करताना दिसत आहे. मात्र होणार्या कारवायांमध्ये सातत्य राहिले तर फोफावणार्या अवैध धंद्यावर काही प्रमाणात का होईना आळा बसेल. जिल्ह्यात व तालुक्यातील वाळु तस्करी प्रशासनाची नेहमीच डोकेदुखी ठरत आहे. यावर जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार प्रांताधिकारी भागवत डोईफोडे, तहसिलदार साहेबराव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी प्रियंका आंबेकर यांनी वाळु तस्करांवर धडक मोहिम राबविण्यास सुरूवात केली आहे.
रिक्षा व चारचाकी वाहनांवरील कारवाईनंतर वाळू साठ्यांवर कारवाई करण्याचे धाडस त्यांनी दाखविले. महसुलच्या पथकासमवेत छापा टाकत तालुक्यातील पठारभागातील जांबुत बुद्रुक, खैरदरा व मोरेवाडी येथे डोगराच्या पायथ्याशी राजू डोंगरे 27 ब्रास, सुभाष डोंगरे 120 ब्रास, पोपट केदार 23 ब्रास, सुरेश मोरे 21 ब्रास आणि निनावी 39 ब्रास असा साठा केलेली वाळू जप्त केली. जवळपास 10 लाख रूपये किंमतीची 250 ब्रास वाळू या ठिकाणी मिळून आली. पावसाळ्यात मुळा नदीला पाणी असल्याने हा साठा पावसाळ्यापूर्वीच करण्यात येतो. हा साठा शासकीय कामासाठी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत असले याची खातरजमा केली जात आहे. या वाळु साठ्याची चौकशी सुरू आहे. चौकशीअंती महसुल विभाग फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या तयारीत असल्याने वाळु माफीयांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी प्रियंका आंबेकर या महिला अधिकार्याने कारवाई केल्याने त्यांचे कौतुक होत असले तरी मुळा नदीपात्रालगत अद्यापही हजारो ब्रास वाळू साठे शिल्लक आहे. वाळू तस्करी स्थानिक तलाठ्यांच्या हल्लेखोरीतून चालू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या संदर्भात 15 जुन 2017 रोजी नाशिकच्या विभागीय आयुक्तांकडे तलाठ्यांच्या नावासह तक्रारी दाखल आहे. त्यामुळे वाळू छापा पथकात याच कर्मचार्यांना सामिल केल्यामुळे इतर वाळू साठ्यांवर कारवाई होवू शकली नाही, अशी ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे. संगमनेर तालुक्यातील मुळा नदीलगत असलेल्या कोठे बु॥, तांगडी, बोरबन, घारगाव, शेळकेवाडी, अकलापूर, देठेवाडी, जांबूत, साकूर, मांडवे अन्य ठिकाणी असलेले वाळुसाठे आता महसुल विभागाच्या रडारवर आहेत. पावसाळ्यात मुळा, प्रवरा व म्हाळुंगी नद्यांना पाणी असल्या कारणाने अशा पध्दतीने वाळू साठे केले जातात. हिच वाळु मोठ्या शहरांमध्ये चढ्याभावाने विकली जाते.
