Breaking News

रस्ता वाहून गेल्याने शालेय विद्यार्थ्यांची म्हाळादेवीत गैरसोय मुदत संपूनही पूलाचे काम रखडले

अकोले, दि. 24 - अकोले तालुक्यातील म्हाळादेवी गावचा एकमेव महत्वाचा रस्ता पावसाच्या पाण्याने वाहून गेल्याने गावाला अंदमान बेटाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. परिणामी जनजीवन विस्कळीत होवून, 150 विद्यार्थ्यांची शाळा बंद झाली आहे. शासनाने तातडीने रस्ता चालू न केल्यास सर्व विद्यार्थ्यांची शाळा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात भरविली जाईल असा इशारा म्हाळादेवी ग्रामस्थांनी केला आहे.
गावाजवळील साखळपाई ओढयावर गतवर्षापासून पुलाचे काम मंदगतीने चालू आहे. कामाची मुदत संपली तरी पुल अपूर्ण असून काम बरेच दिवस बंद आहे. जुना पूल तोडून त्याच ठिकाणी नवीन पुलाची उभारणी चालू आहे. काम धिम्या गतीने व निकृष्ट झाले आहे. काम चालू केल्यावर पर्यायी मजबूत मार्ग काढून देणे ही शासनाची जबाबदारी आहे. ठेकेदार हलगर्जीपणा करुन मलमपट्टी करुन अरुंद व अपघाती मार्ग तयार करुन देतो. असे मामुली मार्ग तयार करण्याच्या दोन तीन वेळा झाल्या आहेत. मार्ग तुटून जातो. ग्रामस्थांचा आरडा ओरडा होतो. पुन्हा ठेकेदार मलमपट्टी करुन रस्ता करतो. यामुळे एसटी सेवा आठ महिण्यापासून बंद आहे. आठ दिवसापूर्वी तयार केलेला पर्यायी रस्ता काल पुराच्या पाण्याने पुर्ण वाहून गेला. दळणवळण पुर्ण बंद झाले. माणसालाही पलीकडे जाणे शक्य नाही. यापुर्वी ग्रामस्थांनी अनेकदा सांगूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने या बाबीकडे पाठ फिरविली.
तालुक्याला जाण्याचा मार्ग बंद झाला. ग्रामस्थ मरण यातना सहन करीत आहे. गावातील इंग्लिश मेडीअम शाळा, मेहेंदुरी हायस्कूल, इंदोरी जि. प. शाळा व अकोले येथे महाविद्यालयीन व शिक्षणासाठी 150 विद्यार्थी रोज ये जा करतात. त्यांची शाळा बंद पडली आहे.
यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी या मुलांची शिक्षणाची सोय अकोले सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात करण्याचा निर्णय सरपंच मंजुळाबाई पथवे, उपसरपंच प्रदीप हासे, विजय हासे, एकनाथ उघडे, आशाताई हासे, संगिता संगारे, स्नेहल मुंढे, जालिंदर हासे, धोंडीराम हासे, विलास आरोटे, सुरेश मुंढे, आनंदा हासे, भास्कर हासे, अशोक हासे, विलास हासे, भरत हासे, विनोद मुंढे, कृष्णा हासे यांनी घेतला आहे.