Breaking News

’जीएसटी’ तून रुद्राक्ष, राष्ट्रीय ध्वज सारख्या वस्तू वगळल्या

नवी दिल्ली, दि. 06 - एक जुलैपासून देशभरात लागू होणार्‍या वस्तू आणि सेवा कराअंतर्गत येणार्‍या वस्तू आणि सेवांचे कर दर वस्तू आणि सेवा परिषदेने निश्‍चित  केले आहेत. खादीचा धागा, गांधी टोपी आणि राष्ट्रीय ध्वज वस्तू आणि सेवा करातून वगळण्यात आल्या असून खोटे दागिने, मोती आणि सोन्याच्या नाण्यांवर 3 टक्के  कर आकारण्यात येणार आहेत. तर रुद्राक्ष, पादुका, पंचामृत, तुळशीमाळ, पवित्र धागा आणि विभूती यांचा समावेश पुजेच्या साहित्यात करण्यात आल्याने आता या  वस्तूंवर कोणताही कर आकारला जाणार नाही.
चंदनाचा टिळा, कोणत्याही ब्रँडखाली न येणारे मध, दिवा बत्ती या वस्तूंना एक जुलैपासून अप्रत्यक्ष कर रचनेतून सूट देण्यात आली असून या वस्तूंवर कोणताही कर  आकारला जाणार नाही. मात्र कापूर, खडीसाखर, बत्ताशा यांसारख्या पूजा साहित्यावर 5 टक्के कर लागणार आहे. रेशीम आणि जूट धागा यांना सवलतीच्या श्रेणीत  ठेवण्यात आले आहे. मात्र, कापूस, नैसर्गिक फायबर आणि इतर सर्व धाग्यांवर 5 टक्के कर आकारला जाणार आहे. मानवनिर्मित रेशीम धाग्यावर 18 टक्के तर खादीचा  अपवाद वगळता अन्य सर्व प्रकारच्या कपड्यांवर 5 टक्के कर आकारला जाणार आहे. एक हजार रुपयांपेक्षा कमी किमतीचे अंथरुण, पांघरुण, शौचालय आणि  स्वयंपाकघरात वापरल्या जाणार्‍या कपडे, टॉवेलवर 5 टक्के कर लागणार आहे. यासोबतच 1 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीचे नॅपकिन, मच्छरदाणी, पिशव्या, लाईफ  जॅकेटवर 5 टक्के कर लागणार आहे. या वस्तूंची किंमत 1 हजार रुपयांपेक्षा जास्त असल्यास त्यावर 12 टक्के कर आकारण्यात येणार आहे.
एक हजार रुपयांपर्यंतच्या कपड्यांवर 5 टक्के कर आकारला जाणार असून सध्या यांवरील कर 7 टक्क्यांपेक्षा कमी आहे. कपड्यांचे किंमत 1 हजार रुपयांहून अधिक  असल्यास 12 टक्के कर लागणार आहे. त्याचप्रमाणे माचिस, डबाबंद जैविक खतांवर 5 टक्के कर लागणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखालील  परिषदेत सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांचा समावेश असून या परिषदेने जवळपास सर्व वस्तू आणि सेवांसाठी आकारण्यात येणार्‍या करांचे दर निश्‍चित केले आहे.