Breaking News

सुकाणू समितीच्या बैठकीत सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

नाशिक, दि. 09 - शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर नाशिकमध्ये आज सुकाणू समितीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीदरम्यान सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम  देण्यात आला आहे. मागण्या मान्य न झाल्यास 12 जून रोजी तहसील कार्यालयावर मोर्चा काढू. तसंच 13 जूनला राज्यभरात रेलरोको करु असा इशारा सुकाणू  समितीतील सदस्य आणि कम्युनिस्ट नेते अजित नवले यांनी दिला आहे.
कर्जमाफी आणि शेतमालाच्या हमी भावासाठी शेतकर्‍यांनी पुकारलेलं आंदोलन यापुढे कसं असणार आहे, यासाठी नव्याने स्थापन झालेल्या सुकाणू समितीची  नाशिकमध्ये बैठक सुरु आहे. या बैठकीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, शेकाप नेते जयंत पाटील, आमदार बच्चू कडू आणि शेतकरी नेते  रघुनाथदादा पाटील नाशिकमध्ये दाखल झाले आहेत.
आम्ही सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम देत आहोत. मागण्या मान्य करा अन्यथा 12 जूनला तहसील कार्यालयावर मोर्चा आणि 13 जूनला रेलरोको करु.  समन्वय समिती अजून मूळ स्वरुपात आलेली नाही, त्यावर चर्चा सुरु आहे. ज्यांची नाव येतील त्याच्यावर विचार करु. एका संघटनेतून एक जण घेतला जाईल आणि  13 जूननंतर पुन्हा बैठक घेणार, असं अजित नवले म्हणाले. पुन्हा नव्याने एकत्र आलो आहोत. शेतकरी कर्जामुळे आत्महत्या करत आहे. पुणतांब्याच्या शेतकर्‍यांची  चूक नाही. पुरोगामी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी भोळ्या भाबड्या शेतकर्‍यांना नाडलं. अशी टीका शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनी केली आहे.