Breaking News

बेदाणा- हळदीवरील जीएसटी रद्दसाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांना भेटणार- संजय पाटील

सांगली, दि. 09 - बेदाणा आणि हळद हे दोन्ही शेतीमाल जीएसटीतून वगळण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांची शनिवार दि. 10 जून रोजी भेट  घेणार असल्याची माहिती खासदार संजय पाटील यांनी दिली.
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीला संजय पाटील यांनी भेट दिली. त्यावेळी बाजार समितीच्यावतीने सभापती प्रशांत शेजाळ यांनी त्यांचा सत्कार केला. त्यावेळी  संजय पाटील बोलत होते. त्यावेळी विष्णुअण्णा पाटील ,फळ- भाजीपाला बाजार समितीचे सभापती अजित बनसोडे, संचालक बाळासाहेब बंडगर, दादासाहेब  कोळेकर, माजी संचालक भारत डुबुले व सचिव पी. एस. पाटील आदी उपस्थित होते.
शेतीमालातील अनेक वस्तूंना वगळण्यात आले असले तरी बेदाणा व हळदीला या कराचा झटका बसला आहे. बेदाण्यास 12 टक्के व हळद- मिरचीला पाच टक्के  जीएसटी लागू करण्यात आला आहे. त्यामुळे हळद व बेदाणा शेतक-यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. शेतक-यांच्या या प्रश्‍नांबाबत अरूण जेटली यांना  शनिवारी भेटणार आहे, असे सांगून संजय पाटील यांनी या कराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चाही केली.
सांगली जिल्ह्यात बेदाण्याची सुमारे दोन हजार कोटी रूपयांची उलाढाल होते, अशी माहिती देऊन प्रशांत शेजाळ म्हणाले, की मागील काही महिन्यांपासून बेदाण्याचे  दर 100 रूपये प्रतिकिलोपेक्षा कमी आले आहेत. याशिवाय जीएसटी लागू केला, तर आणखी दर घसरण्याची शक्यता आहे. हळदीचीही अवस्था बिकट असून त्याचा  दर प्रतिक्विंटल साडे सहा ते सात हजार रूपये इतका झाला आहे. जीएसटी कर लागू केल्याने शेतकरी अडचणीत येणार असून त्यातून आपणच आता मार्ग काढावा,  अशी विनंतीही त्यांनी संजय पाटील यांना केली.