Breaking News

प्रशिक्षकपदासाठी आता सेहवागला रवी शास्त्रींची टक्कर!

नवी दिल्ली, दि. 28 - भारताचे माजी कर्णधार रवी शास्त्री पुन्हा एकदा टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत दाखल होणार आहेत. कारण रवी शास्त्री यांनी  टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळेंची मुख्य प्रशिक्षकपदाची मुदत चॅम्पियन्स  ट्रॉफीनंतर संपली. त्यांनी विंडीज दौर्‍यासाठी दिलेली मुदतवाढ न स्वीकारता या पदाचा नुकताच राजीनामा दिला. त्यामुळे बीसीसीआयने या पदासाठी अर्ज करण्याची  मुदत 9 जुलैपर्यंत वाढवली आहे.
या मुदतवाढीचा फायदा घेऊन रवी शास्त्रीने भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज भरण्याचं नक्की केलं आहे. शास्त्री सध्या लंडनमध्ये असून, त्यांनी आपला  निर्णय न्यू इंडियन एक्स्प्रेस या वर्तमानपत्राकडे बोलून दाखवला आहे. अनिल कुंबळेआधी टीम डायरेक्टर या नात्याने भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची सूत्रं रवी  शास्त्रींच्याच हाती होती. विराट कोहली आणि रवी शास्त्री यांच्यात संबंधही अतिशय उत्तम आहेत. त्यामुळे टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची शर्यत आता चुरशीची  झाली आहे. या शर्यतीत रवी शास्त्रींसह टीम इंडियाचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सहवाग आणि ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटर टॉम मूडी ही बडी नावंही आहेत.