Breaking News

श्रीलंका क्रिकेट बोर्ड मलिंगावर शिस्तभंगाची कारवाई करणार?

कोलंबो, दि. 28 - श्रीलंकेचा गोलंदाज लसिथ मलिंगाविरोधात शिस्तभंगाची कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. वारंवार कराराचं उल्लंघन केल्याप्रकरणी  चौकशीसाठी लवकरच समितीची नियुक्तीही केली जाणार आहे. श्रीलंकेचे क्रीडा मंत्री दयासिरी जयासेकरा यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाप्रकरणी मलिंगाची  चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. मलिंगाने दोन वेळा कराराचं उल्लंघन केलं आहे. माध्यमांमध्ये काहीही बोलण्याआधी मलिंगाला बोर्डाच्या अधिकार्‍यांशी  सल्लामसलत करणं आवश्यक आहे, असं क्रिकइंफोने श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या हवाल्याने म्हटलं आहे.
मलिंगाने 19 जून आणि त्यानंतर 21 जून असं दोन वेळा कराराचं उल्लंघन केलं आहे. त्यामुळे तीन सदस्यीय समिती त्याची चौकशी करणार आहे. ही समिती  कार्यकारी समितीला चौकशीला अहवाल देईल, असं श्रीलंका क्रिकेट बोर्डाने म्हटलं आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने मंगळवारी एक बैठकही बोलावली आहे. ज्यामध्ये  प्रशिक्षक ग्राहम फोर्ड यांचा राजीनामा आणि नव्या प्रशिक्षकाच्या नियुक्तीविषयी चर्चा केली जाणार आहे.