Breaking News

खल रक्षणाय् सद् निग्रहणाय...?

दि. 30, जून - भयमुक्त महाराष्ट्र करणार, शिवशाहीत होते तसे वातावरण प्रसन्न करणार वगैरे सवंग वल्गना करणार्‍या शासन काळात ज्यांनी अमंलबजावणी करायची  तेच जनसामान्यांच्या मुलभूत अधिकाराचा घास घेऊ लागले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या गावात अवैध धंदे चव्हाट्यावर आणणार्‍या कार्यकर्त्याला बळ देण्याऐवजी गुन्हेगारांशी  संगनमत करण्याचा सट्टा खेळला जातो.नंगटखोरांविरूध्द पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून घेतली जात नाही म्हणून तक्रारदाराला स्वतःच्याच वाहनाला गळफास  लावून आत्महत्या करावी लागते. सन्माननीय न्यायालयाचा कब्जा आदेश असतांनाही जमीन मालकाला वेडे ठरवून त्याची जमीन हडप करू पाहणार्या गावगुंडांच्या  डावात पोलीस यंत्रणाही हात मोकळा सोडते. आणि हे सारे माध्यमांच्या वेशीवर टांगून खाकीत दडलेल्या राक्षसी लतखोरीला उघडे पाडणार्‍या पत्रकारीतेचा कधी  प्रशांत कांबळे केला जातो, कधी सुनील ढेपे. तर कधी देवानंद बैरागी.छत्रपतींचे वारंवार नाव घेऊन कारभार सुरू असलेल्या म.फुले, राजश्री शाहु महाराज, डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात नक्की चाललयं काय? शिवशाहीत रामराज्य या सुखद कल्पनेची संकल्पना ती हीच आहे का? अर्थात खाकीच्या आत  दडलेल्या राक्षसी लतखोरीवर प्रहार करतांना पोलीस दलात राबणार्‍या  मानसाला आणि त्यातील माणूसकीचीही दखल टाळता येणार नाही...
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा महाराष्ट्रातील अभ्यासू राजकीय व्यक्तीमत्व म्हणून परिचीत आहे. आपल्या आजवरच्या राजकीय कारकिर्दीतील  बहुतांश काळ त्यांनी विरोधी नेता म्हणून व्यतीत केला. परिणामी महाराष्ट्राचं दुखणं त्यांना मुखोद्गत आहे. सामान्य माणसाची नाडी ते चांगली जाणतात. सामान्य  माणसाला काय हवं याची त्यांना पुर्ण जाणीव आहे. आणि म्हणूनच विरोधी पक्षात असतांना सामान्य माणसाचं हेच दुःख घेऊन फडणवीस सभागृहात आणि  सभागृहाबाहेर हजारवेळा तत्कालीन सत्ताधार्‍यांशी लढल्याचे महाराष्ट्राने अनुभवले. सामान्य माणसाला न्याय मिळावा म्हणून विरोधी पक्षनेता म्हणून फडणविस यांची  कारकिर्द विशेष उल्लेखनीय म्हणून राजकीय इतिहासात नोंदली जावी इतपत दखलपात्र आहे.आणि म्हणूनच असा नेता महाराष्ट्राला मुख्यमी म्हणून लाभला हे खरेतर  सुदैव म्हणायला हवं. तथापि सामान्य माणसाच्या दुःखाला कारणीभुत ठरवून तत्कालीन सरकारला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करणारे फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर  सामान्यांच्या उंचावलेल्या अपेक्षा पुर्ण करतांना अद्याप चाचपडत असल्याचे दिसते आहे, प्रचंड इच्छाशक्ती असूनही कदाचित नाकापेक्षा मोती जड होत असावेत असा  आडाखा बांधण्यास त्यांचीच देहबोली वाव देते.राज्याचा प्रमुख म्हणून सरकार आणि प्रसरकार (प्रशासन) या दोघांवर त्यांची अजूनही हवी तशी पकड घट्ट झाल्याचे  प्रत्यक्षात जाणवत नाही. विशेषतः त्यांच्याच अखत्यारीतील गृहखात्यासंदर्भात सामान्यांचा अनुभव भयावह आहे.
मुख्यमंत्र्यांच्याच गावात गेल्या आठवड्यात 20 जुनला घडलेली  घटना ही भयानकता स्पष्ट करते.
आयपीएल सामन्यांत लावलेल्या सट्ट्याच्या व्यवहारातून काही मंडळींमध्ये सोमलवाडा चौकात वाद झाला. जवळच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संगठनचे नागपुर शहर  सचिव, शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गजानन चकोले, मित्र रोशन धुर्वे यांच्या भावासोबत उभे होते, हा वाद लक्षात आल्यानंतर वाद घालणारे नागपुरच्या पंचक्रोशीत  सट्ट्याचे रकेट चालविणारे मंगेश खुबाळकर आणि स्वप्निल सोळंखी यांची समजूत काढण्यासाठी गजानन चकोले यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. चकोले यांची  मध्यस्थी न पचल्याने संबंधित बुकींनी चकोले यांना धमकावले. हे प्रकरण इथेच थांबले नाही तर बुकींनी भ्रमणध्वनीवर साथीदारांशी संपर्क करून पन्नास ते साठ  जणांना बोलावून घेतले. या टोळक्याने चकोले यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. हे प्रकरण सोनेगाव पोलीस ठाण्याच्या दरबारात पोहचले तिथेही परंपरेला शोभणारा  अनुभव आला. वपोनि पांडे यांनी घडलेला प्रकार ऐकुन बुकी फिरस्ते असतात, त्यांचा माग काढणे अशक्य असल्याची बतावणी केली. संबंधितांची नावं, भ्रमणध्वनी  क्रमांक दिल्यानंतरही पोलीस निरिक्षकांनी खाकीला साजेसे उत्तर देऊन तक्रार दारांची बोळवण केली.
दुसरी घटना मुख्यमंत्र्यांच्याच विदर्भातील अमरावतीची आहे.
धामनगाव रेल्वेगावातील विनोद शालिक लवने काही ग्रामस्थांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी गेले असता ठाणेदाराने तक्रार घेण्याऐवजी त्यांचीच उलट तपासणी  करून तक्रार घेण्यास नकार दिला. या छळाला कंटाळून  विनोद लवने या 40 वर्षीय युवकानं आपल्या वाहनाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
विनोद शालिक लवने असे मृतक युवकाचे नाव आहे. तो निबोली इथला रहिवासी आहे. आणि तो टाटा यस गाडी चालवून विनोद आपल्या कुटुंबाचं पोट भरायचा.  मंगरूळ दस्तगिर पोलिस ठाण्यात  गावातील काही युवकाची तक्रार करण्यासाठी गेला होता. मात्र ठाणेदार अमित वानखडे यांनी आपल्याला मारहाण केली, त्यामुळे  आपण जीवन यात्रा संपवीत असल्याचे  विनोदने मृत्यपूर्व चिठ्ठीत लिहून ठेवलंय. पत्रकार प्रशांत कांबळे आणि अन्य पत्रकारावर पोलिसी अत्याचाराचं प्रकरण ताज  असताना, अमरावती पोलिसांच्या अमानुषतेच हे दुसर प्रकरण समोर आलंय. त्यामुळे अमरावती पोलिसांचा खरा चेहरा जगासमोर आलाय.
तिसरी घटना आहे मुख्यमंत्र्यांचे दत्तक गाव नाशिकची. नाशिक शहराच्या जवळ पण सिन्नर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणार्‍या पांढुर्ली गावातील एका गरीब  शेतकरी कुटुंबाची जमीन गावगुंड भुमाफिया हडप करू पहात आहेत. अत्यंत हलाखीची परिथिती असतांनाही कायदेशीर लढाई जिंकणार्‍या या कुटुंबाला वेडे ठरविण्याचा  घाट घातला गेलाय, मानसिक छळ करून त्यांचे खच्चीकरण सुरू आहे. कब्जा आदेश असतांनाही बंदोबस्त, मनुष्य बळाचा अभाव या सारखे कारण पुढे करून गेली  दोन वर्ष पोलीस यंत्रणा न्यायासोबत फारकत घेत शेतकर्‍याला कजासाठी बंदोंबस्त नाकारत आहे. अशा अनेक घटना महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात सर्रास घडत आहेत.
पोलीस अवैध धंद्याना संरक्षण देतात असा सामान्यांचा आरोप आहे.  वरली मटका, जुगार, हुक्का पार्लर, मसाज पार्लर, विंगोबींगो असे नाना अवैध   व्यवसाय जोरात  सुरु आहेत. मात्र पोलिसांचा त्रास हा मोलमजूरी करणार्‍या, मालवाहतूक पीकअप चालवणार्‍या गोरगरिबाना हॉकर्स, अशा सामान्यांनाच जास्त होत आहे.
 एखाद्या पत्रकाराने यावर बातमी केली तर त्याचा प्रशांत कांबळे होतो, एखाद्याने भीक घातली नाही तर सुनील ढेपे करण्याची धमकी दिली जाते, अथवा यंत्रणेच्या  विरूध्द वृत्तांकन केले म्हणून, वृत्तांकन करतांना पत्रकाराला धक्काबुक्की होते तेंव्हा सर्व शासकीय यंत्रणा प्रत्यक्षदर्शी असतांनाही गुन्हेगारांवर कारवाई होत नाही, उलट  घटनेच्या चोवीस तासानंतर त्याच पत्रकाराविरूध्द धक्काबुक्कीखोरांनी खंडणीचाची तक्रार दिली तर सारी यंत्रणा झपाटून कामाला लागते.
फडणवीस मुख्यमंत्री असलेल्या या महाराष्ट्राचे हे जळजळीत वास्तव आहे. जिथे पत्रकारच दरोडेखोर खंडणीखोर गुन्हेगार ठरविले जातात तिथे सामान्य माणसाची खैर  काय? अर्थात पोलीस दलातील ही एक प्रवृत्ती आहे. खांद्यावर मिरवणारे ब्रीद सार्थ ठरविणारे काही महानुभवही पोलीस दलात आहेत. त्यांच्या असण्यामुळेच पोलीस  दलाच्या प्रतिष्ठेचे अस्तित्व कायम आहे. त्याची दखल घेत या खाकीतील मानवतेला सलाम ठोकावाच लागेल.