नांदेडमध्ये वाहने जाळण्याचे सत्र पुन्हा सुरू
नांदेड, दि. 03 - शहरात गेल्या सहा - सात महिन्यापूर्वी थांबलेल्या दुचाकी जाळण्याचे सत्र पुन्हा सुरु झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. काल रात्री काही समाजकंटकाकडून तीन दुचाक्या जाळून शहरात दहशत निर्माण करण्यात प्रयत्न केला जात असल्याचे परिसरातील नागरिक बोलून दाखवीत आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार्या तरोडा भागात काल दि.01 जूनच्या मध्यरात्रीला काही अज्ञात समाज कंटकांनी तुळजाभवानी नगर परिसरात घराच्या बाहेर लावलेल्या दुचाक्या जाळून दहशत पासारविण्याचा प्रयत्न केला आहे. मध्यरात्री 12.15 वाजेच्या सुमारास सर्वजण गाड झोपेत असताना प्रा.विशाल कंधारकार यांच्या घरच्या गेटजवळ लावण्यात आलेल्या बजाज कंपनीची डिस्कवर दुचाकी क्रमांक एम.एच.26 ए क्यू 2360 जाळण्यात आली आहे. तरोडा भागातील विकास नगर परिसरात राहणारे श्रीनिवास येरनाळीकर यांची दुचाकी क्रमांक एम.एच.26 वाय 8854 हि शुद्ध मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास जाळण्यात आली. तसेच कल्याण नगर, तरोडा बु. येथील राजरत्न भास्कर दीपक यांची मोटार सायकल क्रमांक एम.एच.48 एम 5451 हि सुद्धा जाळण्यात आली आहे. याबाबतची तक्रार संबंधितांनाही भाग्यनगर पोलीस ठाण्याला दिली असून, याची चौकशी करावी आणि नांदेड शहरात दहशत माजविणार्या अज्ञातांवर कार्यवाही करून पुन्हा या घटना घडणार नाहीत याकरिता पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी लक्ष केंद्रित करून नागरिकांना सुरक्षा द्यावी अशी मागणी केली जात आहे.
