Breaking News

पारसिक बोगद्यावर सुरक्षिततेच्या दृष्टीने त्वरित उपाय योजना करा - महापौर मिनाक्षी शिंदे

ठाणे, दि. 03 - महापालिका कार्यक्षेत्रात येत असलेल्या मध्य रेल्वे लाईनवरील पारसिक बोगद्याच्या दोन्ही बाजूस तातडीने उपाय योजना करण्याचे आदेश महापौर  सौ.मिनाक्षी शिंदे हयांनी आज ठाणे रेल्वे प्रवाशी संघाबरोबर झालेल्या बैठकीमध्ये प्रशासनास दिले.
पारसिक बोगदयावरील विविध समस्यांबाबत ठाणे पारसिक रेल्वे संघटने बरोबर महापौर यांचे अध्यक्षते खाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस ठाणे  रेल्वे प्रवाशी संघाचे पदाधिकारी नंदकुमार देशमुख, लता अरगडे, सुधाकर पतंगराव, अभिजीत धुरत, वंदना सोनावणे, सुमती गायकवाड, वंदना महिले, सुवर्णा रुपवते,  नेहा सुगंधी, दिपाली घोगरे, सुवर्णा भगते तर प्रशासनाच्या वतीने उपआयुक्त संदीप माळवी व वैद्यकीय अधिकारी डॉ.हळदेकर आदि उपस्थित होते.
मागील वर्षी पारसिक बोगदयावरील संरक्षक भिंत कोसळली होती, या पार्श्‍वभूमीवर पावसाळयात कोणती दुर्घटना घडू नये यासाठी आवश्यक उपाय योजना करणेसाठी  महापौर यांनी यापूर्वी प्रशासनास कळविलेले आहे. तथापि, ठाणे रेल्वे प्रवाशी संघटनेने दिलेल्या निवेदनानुसार महापौर यांचे दालनात बैठक आयोजित करण्यात आली  होती. या बैठकीमध्ये संबंधितांशी चर्चा करुन मुंब्रा बाजूस संरक्षण भिंतीचे चालू असलेले काम त्वरित पूर्ण करणे, कळवा बाजूस असलेला कचरा हटविणे, मोडकळीस  आलेल्या शौचालयास पर्यायी व्यवस्था करुन शौचालय निष्काषित करणे, नागरिकांमध्ये जनजागृती करणे आदि कामे करणेबाबत महापौर यांनी सूचना दिली. तर  भविष्यात कोणतीही दुर्घटना घडून रेल्वे प्रशाशांबरोबर येथील नागरिकांच्या देखील जीवाला धोका निर्माण होवू शकतो यासाठी कायम स्वरुपी उपाय योजना  करण्यासाठी येथील नागरिकांचे पुनर्वसन करणे, सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाय योजना करणे आदि बाबत निर्णय घेण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली  सर्व खासदार, आमदार, महापालिका प्रशासन, रेल्वे प्रशासन, वन विभाग, स्थानिक लोकप्रतिनिधी व रेल्वे प्रवाशी संघटना यांची संयुक्तिक बैठक घेवून निर्णय घेण्यात  येईल असेही महापौर यांनी यावेळी नमूद केले.
पारसिक बोगदा परिसरात रहात असलेल्या नागरिकांनी कचरा रेल्वे बोगद्यात टाकू नये, महापालिका व रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात येणार्‍या उपाय योजना व  सूचनांचे पालन करुन सहकार्य करावे असे आवाहन देखील यावेळी केले.